ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा मालिकाविजय

चार धावांनी सरशी साधून ट्वेन्टी-२० मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.
 ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताचा मालिकाविजय

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताने यजमान आयर्लंडवर अवघ्या चार धावांनी सरशी साधून ट्वेन्टी-२० मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. शतकवीर दीपक हूडाने (५७ चेंडूंत १०४ धावा) सामनावीर व मालिकावीर पुरस्कार पटकावला.

भारतीय वेळेनुसार मंगळवार मध्यरात्रीपर्यंत रसिकांना खिळवून ठेवणऱ्या या लढतीत आयर्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. उमरान मलिकच्या पहिल्या तीन चेंडूंवर आयर्लंडच्या फलंदाजांनी नऊ धावा लुटल्या. परंतु पुढील तीन चेंडूंत उमरानने तीनच धावा दिल्यामुळे भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. भारताने दिलेल्या २२६ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने २० षटकांत ५ बाद २२१ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार अँडी बल्बिर्नी (६०), पॉल स्टर्लिंग (४०), हॅरी टॅक्टर (३९), जॉर्ज डॉकरेल (नाबाद ३४) यांनी आयर्लंडच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना हूडा आणि आणि संजू सॅमसन (४२ चेंडूंत ७७) यांच्या विक्रमी दीडशतकी भागीदारीमुळे भारताने २० षटकांत ७ बाद २२५ धावांचा डोंगर उभारला. सॅमसनने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. हे दोघे बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल हे तिघे पहिल्याच चेंडूवर बाद झाले. परंतु सूर्यकुमार यादव (१५) आणि हार्दिक पंड्या (नाबाद १३) यांनी उपयुक्त योगदान देत भारताला २०० धावांचा पल्ला गाठून दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in