भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल; महिला क्रिकेट संघाने मिळवला इंग्लंडवर विजय

विजयासाठी भारताने ठेवलेल्या भारताने ठेवलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला निर्धारित षट्कांत सहा बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल; महिला क्रिकेट संघाने मिळवला इंग्लंडवर विजय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवव्या दिवशी पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंडवर चार धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आल्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरी गाठून इतिहास घडविला. भारतासाठी आता किमान एक पदक पक्के झाले आहे. रौप्यपदक मिळणार हे निश्चित असले, तरी आता सुवर्णपदकाच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.

विजयासाठी भारताने ठेवलेल्या भारताने ठेवलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला निर्धारित षट्कांत सहा बाद १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधनाने (३२ चेंडूत ६१ धावा) दमदार खेळी केली. जेमिमाह रॉड्रिग्जने (३१ चेंडूंत नाबाद ४४ धावा) झुंजार खेळी करत भारताला २० षट्कांत पाच बाद १६५ अशी धावसंख्या रचून दिली. त्यानंतर गोलंदाजीत स्नेह राणाने दोन विकेट‌्स घेतल्या. दीप्ती शर्माने एक विकेट मिळविली. क्षेत्ररक्षकांनी तब्बल तीन फलंदाज धावबाद केले.

भारताने इंग्लंडला ठरावीक अंतराने धक्के देत त्यांच्या धावगतीला आळा घातला. इंग्लंडकडून कर्णधार नॅत सिव्हरने (४३ चेंडूंत ४१ धावा) झुंजार खेळी केली. तिला एमी जोनसने (२४ चेंडूंत ३१ धावा) दमदार साथ देण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेरच्या षट्कापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट‌्स घेतल्या.

भारतीय क्षेत्ररक्षकांनीही चपळाईची कामगिरी करत नॅत, ॲलिस कॅपसी आणि एमी जोन्स या तिघींना धावबाद केले. शेवटच्या षट्कात इंग्लंडला विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना स्नेह राणाने अवघ्या नऊ धावा दिल्या.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी धडाकेबाज सुरुवात केली. ७.५ षट्कांत ७६ धावांची सलामी दिली. दमदार सुरुवात करून दिल्यानंतर स्मृती मानधना नवव्या षट्कात, तर शेफाली (१७ चेंडूंत १५ धावा) आठव्या षट्कात बाद झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; मात्र दुसऱ्या बाजूनचे तिला अपेक्षित साथ मिळू शकली नाही. कर्णधार हरमनप्रीत कौर (२० चेंडूत २० धावा) लवकर बाद झाली. त्यानंतर जेमिमाहने दीप्ती शर्मा (२० चेंडूत २२ धावा) हिच्यासोबत ५३ धावांची भागीदारी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in