विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाची पदकनिश्चिती

पात्रता फेरीत सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय त्रिकुटाने दडपणाखाली मात्र लौकिकाला साजेसा खेळ केला
विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघाची पदकनिश्चिती

भारतीय महिला संघाने गुरुवारी विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून पदकनिश्चिती केली. पात्रता फेरीत सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय त्रिकुटाने दडपणाखाली मात्र लौकिकाला साजेसा खेळ केला.

पॅरिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दीपिका कुमारी, अंकिता भाकट आणि सिमरनजीत कौर या तिघींचा समावेश असलेल्या भारतीय संघाने अनुक्रमे युक्रेन, ब्रिटन आणि टर्कीला धूळ चारून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत त्यांच्यासमोर तिसऱ्या चायनीज तैपईचे कडवे आव्हान असेल. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तैपईने कांस्यपदक पटकावले होते.

१३व्या मानांकित भारतीय संघाने उपउपांत्यपूर्व सामन्यात चौथ्या मानांकित युक्रेनवर ५-१ (५७-५३, ५७-५४, ५५-५५) असे विजय मिळवला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा भारताने ६-० (५९-५१, ५९-५१, ५८-५०) असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत टर्कीविरुद्ध भारताचा खरा कस लागणार होता. भारताने पहिला सेट ५६-५१ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटमध्ये भारताने ५७-५६ अशी सरशी साधली. तिसऱ्या सेटमध्ये टर्कीने ५५-५४ असा विजय मिळवून सामन्यातील रंगत २-४ कायम राखली. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये दोन्ही संघांनी ५५-५५ अशी बरोबरी साधली. परंतु भारताचे पाच गुण झाल्यामुळे त्यांनी पुढील फेरीत प्रवेश केला. अन्य उपांत्य सामन्यात तैपईने दक्षिण कोरियाला नमवले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in