भारतीय महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी ; बांगलादेशविरुद्ध ९६ धावांचा बचाव करण्यात यश

ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (१२ धावांत ३ बळी) भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली
भारतीय महिला संघाची मालिकेत विजयी आघाडी ; बांगलादेशविरुद्ध ९६ धावांचा बचाव करण्यात यश

मिरपूर : भारताच्या फिरकी चौकटाने पुन्हा एकदा केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर महिला संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ धावांनी सरशी साधली. ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (१२ धावांत ३ बळी) भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. या विजयासह भारताने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली.

मिरपूर येथे झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ८ बाद ९५ धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार हरमनप्रीत कौर (०), जेमिमा रॉड्रिग्ज (८), हरलीन देओल (६), स्मृती मानधना (१३) यांनी निराशा केली. शफाली वर्माच्या १९ धावा भारतीय डावातील सर्वोच्च ठरल्या. ऑफस्पिनर सुल्ताना खातूनने तीन बळी मिळवले. भारताची ही बांगलादेशविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. त्यामुळे भारतीय संघ ही लढत गमावणार, असेच वाटले.

मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २० षटकांत ८७ धावांवर आटोपला. दीप्ती आणि शफाली यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. तर मिन्नू मणीने दोन व अनुषा बरेड्डीने एक गटी टिपून उत्तम साथ दिली. मुख्य म्हणजे ५ बाद ८६ अशी स्थिती असताना बांगलादेशने ८ चेंडूंच्या अंतरात फक्त एक धाव करून अखेरचे पाच फलंदाज गमावले. कर्णधार निगर सुल्तानाने बांगलादेशसाठी ३८ धावांची एकाकी झुंज दिली. उभय संघांतील तिसरी लढत गुरुवारी खेळवण्यात येईल.

या सामन्यात तब्बल ३५ षटके (भारताने १९, बांगलादेशने १६) फिरकीपटूंनी टाकली. तसेच २०पैकी १६ बळी फिरकीपटूंनीच मिळवले. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दुसऱ्यांदाच असे घडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in