भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना रविवारी होणार असून या सामन्यात विजय मिळून मालिका खिशात घालण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील. पहिल्या सामन्यात पाहुण्यांचा दणदणीत पराभव केल्याने आत्मविश्वास वाढलेल्या टीम इंडियाला मालिका जिंकण्याची नामी संधी आहे.
दोन वर्षांनंतर गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सामना होत आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. रोहित शर्मा आणि के एल राहुल या सलामीवीरांना भक्कम पायाभरणी करावी लागेल. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहितला लयीत यावे लागेल. सलामीची जोडी अपयशी ठरल्यास विराट कोहलीमध्ये डाव सावरण्याची क्षमता आहे. त्याला गेल्या काही सामान्यांपासून लय सापडली आहे. सूर्यकुमारला फॉर्म टिकवावा लागेल; तर हार्दिकला अष्टपैलुत्वाचे सातत्य राखावे लागेल. ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. कार्तिक टीम इंडियासाठी फिनिशर म्हणून पुढे येत आहे. दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दीपक चहर, अर्शदीप सिंग यांचाही समावेश असेल. फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या या खेळपट्टीवर अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन कमाल दाखवू शकतात.