भारताचा आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत प्रवेश

भारताने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला निर्धारीत २० षटकांत ५ बाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली
भारताचा आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत प्रवेश

चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला मुंबईकर सूर्यकुमार यादव (२६ चेंडूंत नाबाद ६८ धावा) आणि अनुभवी विराट कोहली (४४ चेंडूंत नाबाद ५९ धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-फोर फेरीत प्रवेश केला.

भारताने दिलेल्या १९३ धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला निर्धारीत २० षटकांत ५ बाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताने सलग दुसऱ्या विजयासह अ-गटात अग्रस्थान मिळवले. प्रत्येकी सहा चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा सूर्यकुमार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेता अ-गटातून दुसऱ्या स्थानासह सुपर-फोरसाठी पात्र ठरेल.

प्रथम फलंदाजी करताना भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (१३ चेंडूंत २१) आक्रमक सुरुवात केली. परंतु तो बाद झाल्यानंतर धावगती खालावली. के. एल. राहुल आणि कोहली यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४९ चेंडूंत ५६ धावांची भर घातली. परंतु राहुलला ३९ चेंडूंत ३६ धावाच फटकावता आल्या. राहुल बाद झाल्यानंतर सूर्यकुमारचे मैदानावर आगमन झाले आणि त्याने सामन्याचा नूरच पालटला. दुसऱ्या बाजूने कोहलीने एक चौकार आणि तीन षटकारांसह ५९ धावांची संयमी खेळी साकारली. अखेरच्या षटकात सूर्यकुमारने तब्बल चार षटकार लगावताना एकूण २६ धावांची कमाई केल्यामुळे भारताने २० षटकांत २ बाद १९२ धावांपर्यंत मजल मारली. कोहली आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ९८ धावांची अभेद्य भागीदारी रचली.

लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगकडून बाबर हयात (४१) आणि किंचीत शाह (३०) यांनी कडवी झुंज दिली. परंतु अपेक्षित धावगती राखण्यात अपयश आल्याने त्यांना जेमतेम १५० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. भारताकडून रवींद्र जडेजा, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक बळी मिळवला. मात्र आवेश आणि अर्शदीप यांनी चार षटकांत अनुक्रमे ५३ आणि ४४ धावांची लयलूट केली.

विजेत्यांना एक कोटींचे पारितोषिक

अल्टिमेट खो-खो लीगच्या पहिल्या पर्वाच्या विजेत्यांना १ कोटी रुपये देऊन गौरवण्यात येईल, असे आयोजकांनी गुरुवारी जाहीर केले. तसेच उपविजेत्या संघाला ५० लाख, तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला ३० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. उर्वरित २० लाखांमधूनही स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खो-खोपटूंना गौरवण्यात येईल, असे समजते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in