
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेला मुकणार आहे. शमीच्या जागी विदर्भाच्या उमेश यादवची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
“विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या शमीच्या कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नाइलाजास्तव शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळू शकणार नाही. त्याच्या जागी उमेशला संघात स्थान देण्यात आले आहे,” असे बीसीसीआयने जाहीर केले.
३५ वर्षीय उमेश २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामना खेळला आहे. २०२२च्या आयपीएलमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. गेल्या काही आठवड्यांपासून तो इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळत होता; मात्र तेथे दुखापत झाल्यानंतर उमेश बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. आता तो तंदुरुस्त झाल्याने त्याला संधी देण्यात आली आहे.