
गतविजेत्या भारतीय संघाने गुरुवारी नेपाळचा ४-० असा धुव्वा उडवून सॅफ फुटबॉल स्पर्धेचे (१७ वर्षांखालील मुले) जेतेपद मिळवले.
कोलंबो येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बॉबी सिंग, कोरू सिंग, कर्णधार वान्लापेका गुटे आणि अमन यांनी भारतासाठी प्रत्येकी एक गोल केला. साखळी लढतीतही भारताने नेपाळला ३-१ असे पराभूत केले होते. १२व्या मिनिटाला बॉबीने पहिला गोल नोंदवला. कोरूने ३९व्या मिनिटाला गोल नोंदवून भारताची आघाडी २-० अशी वाढवली.
मध्यंतरानंतर गुटेने ६३व्या मिनिटाला तिसरा गोल झळकावला, तर भरपाई वेळेत अमनने चौथा गोल नोंदवून थाटात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताचा कर्णधार गुटेलाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर साहिल सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. मुख्य प्रशिक्षक बिबियानो फर्नांडीस यांनी भारताच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले आहे.
एकीकडे फिफाने घातलेली भारतावर बंदी आणि कोरोनाच्या सावटादरम्यानही भारतीय युवकांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून भविष्यात त्यांच्याकडून अधिक चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.