
भारताने इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची वन-डे मालिका २-१ अशी जिंकल्याने भारताचे आयसीसी वन-डे क्रमवारीतील स्थान आणखी मजबूत झाले.
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ऋषभ पंतच्या नाबाद १२५ आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी याच्या जोरावर भारताने पाच गडी राखून विजय मिळवित भारताने मालिका २-१ अशी जिंकली. या मालिका विजयानंतर भारताचे आता १०९ गुण झाले असून, भारत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्या खालोखाल भारताचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान १०६ गुण घेऊन चौथ्या स्थानावर आहे.
न्यूझीलंड १२८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. इंग्लंड १२१ गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. क्रमवारीत आता काही बदल झाला नसला तरी येणाऱ्या आठवड्यात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
सहाव्या स्थानावर असलेला दक्षिण आफ्रिका पाकिस्तानपेक्षा फक्त ७ गुणांनी पिछाडीवर आहे. त्यांनी आगामी तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला क्लीनस्वीप दिला तर ते चौथ्या स्थानावर पोहोचू शकतात. त्यामुळे पाकिस्तानचे रँकिंग घसरण्याची शक्यता आहे.
भारतालादेखील क्रमवारीत आघाडी वाढविण्याची संधी आहे. येत्या २२ जुलैपासून वेस्ट इंडिजबरोबर होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने चमकदार कामगिरी केल्यास पाकिस्तान आणि भारत यांच्यातील गुणांमधील फरक आणखी वाढू शकतो. पाकिस्तान सध्या श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. त्यांची वन-डे मालिका ही पुढील महिन्यात नेदरलँडविरुद्ध असणार आहे. या मालिकेत बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानचा संघ पाच दिवसात पाच वन-डे सामने खेळणार आहे.