दाक्षिणात्य संघांत आज जुगलबंदी! चेन्नईची हैदराबादशी त्यांच्याच मैदानात गाठ; विजयपथावर परतण्यासाठी द्वंद्व

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली यंदाच्या हंगामात खेळणाऱ्या चेन्नईने पहिल्या दोन सामन्यांत घरच्या मैदानात बंगळुरू आणि गुजरात यांना सहज धूळ चारली. मात्र तिसऱ्या लढतीत दिल्लीविरुद्ध खेळताना त्यांचा पराभव झाला. अन्य संघांप्रमाणेच चेन्नईलाही प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर छाप पाडण्यात अपयश आले. मात्र या लढतीत अनुभवी महेंद्रसिंह धोनीने धडाकेबाज फलंदाजीद्वारे चाहत्यांची मने जिंकली.
दाक्षिणात्य संघांत आज जुगलबंदी! चेन्नईची हैदराबादशी त्यांच्याच मैदानात गाठ; विजयपथावर परतण्यासाठी द्वंद्व
Published on

हैदराबाद : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १७वा हंगाम आता हळूहळू रंगू लागला आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी आणि अखेरच्या षटकापर्यंत रंगणाऱ्या थरारात शुक्रवारी चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद या दक्षिणेकडील संघांमधील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आपापला मागील सामना गमावलेला आहे. त्यामुळे कोणता संघ विजयपथावर परतणार, हे पाहणे रंजक ठरेल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होणार आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली यंदाच्या हंगामात खेळणाऱ्या चेन्नईने पहिल्या दोन सामन्यांत घरच्या मैदानात बंगळुरू आणि गुजरात यांना सहज धूळ चारली. मात्र तिसऱ्या लढतीत दिल्लीविरुद्ध खेळताना त्यांचा पराभव झाला. अन्य संघांप्रमाणेच चेन्नईलाही प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर छाप पाडण्यात अपयश आले. मात्र या लढतीत अनुभवी महेंद्रसिंह धोनीने धडाकेबाज फलंदाजीद्वारे चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा चाहते धोनीची फटकेबाजी पाहण्यासाठी गर्दी करतील, यात शंका नाही. मात्र त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे चेन्नईचा संघ तिसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या हैदराबादकडे एकापेक्षा एक धोकादायक आणि एकहाती सामना जिंकवून देणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. मात्र या संघाला तीनपैकी एकच लढत जिंकता आली आहे. कोलकाताविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर हैदराबादने मुंबईला विक्रमी धावसंख्या रचून नमवले. मग गुजरातविरुद्ध हैदराबादचा संघ पुन्हा पराभूत झाला. त्यामुळे तेसुद्धा विजयपथावर परतण्यास आतुर आहेत. या स्टेडियमवर मुंबई-हैदराबाद लढतीत धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. त्यामुळे चेन्नई-हैदराबाद लढतीतसुद्धा प्रथम फलंदाजी करणारा संघ २०० धावा नक्कीच उभारेल, असे दिसते.

ऋतुराजकडून मोठी खेळी अपेक्षित

कर्णधार ऋतुराजला अद्याप तीन सामन्यांत (१५, ४६, १) मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. त्याचा साथीदार रचिन रवींद्र मात्र जबरदस्त फॉर्मात आहे. त्याशिवाय शिवम दुबेही सातत्याने योगदान देत आहे. रवींद्र जडेजाचे अपयश चेन्नईला महागात पडत आहे. त्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि डॅरेल मिचेल यांना मधल्या षटकांत आक्रमक फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीत पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेला मुस्तफिझूर रहमान या लढतीसाठी अनुपलब्ध असल्याने मुकेश चौधरीला खेळवण्यात येईल, असे समजते. मथिशा पाथिराना व दीपक चहर यांच्यावर अतिरिक्त दडपण असेल. फिरकीपटू महीष थिक्षणाला संधी दिली जाऊ शकते.

विदेशी चौकडी हैदराबादची ताकद

कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कमिन्स, सलामीवीर ट्रेव्हिस हेड, आफ्रिकेचा एडीन मार्करम आणि धोकादायक हेनरिच क्लासेन या विदेशी चौकडीवर हैदराबादचे भवितव्य अवलंबून आहे. गुजरातविरुद्धचे फलंदाजीतील अपयश बाजूला सारून हा संघ घरच्या मैदानात चमकदार कामगिरी करण्यास आतुर आहे. अभिषेक शर्माही लयीत आहे. मात्र मयांक अगरवाल आणि अब्दुल समद यांच्या जागी अन्य एकाला संधी देता येऊ शकते. गोलंदाजीत टी. नटराजन जायबंदी असल्याने भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट या वेगवान जोडीवर हैदराबादची भिस्त असेल. मयांक मार्कंडे फिरकीची धुरा वाहेल. ग्लेन फिलिप्स, मार्को यान्सेन यांना मात्र पुन्हा संघाबाहेर रहावे लागेल, असे दिसते.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, वानिंदू हसरंगा, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव.

logo
marathi.freepressjournal.in