लखनऊ : प्रतिभावान वेगवान गोलंदाजांना कायम विविधता आणण्यास सांगितले जाते. पण, ही विविधता मिळविण्यासाठी वेगाशी कधीही तडजोड करू नको, असा सल्ला भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने दिल्याचे मयांक यादवने सांगितले.
यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळणाऱ्या मयांक यादवच्या भन्नाट वेगाची चर्चा आहे. भारताचा नवा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितले जाऊ लागले आहे. मयांकने बंगळुरूविरुद्धच्या लढतीत कॅमेरून ग्रीनचा अफलातून चेंडूवर त्रिफळा उडवला. तसेच तब्बल १५६.७ किमीच्या वेगान एक चेंडू टाकला. आपल्या या वेगाबाबत बोलताना मयांक म्हणाला, “ईशांत शर्मा आणि दुसरा सहकारी नवदीप सैनी या दोघांनीही मला नवे प्रयोग करताना वेगाशी तडजोड करू नकोस असेच सांगितले. नवे कौशल्यही हे वेगाच्या जवळपास असायला हवे, असा सल्ला दिला.”
“गोलंदाजी करताना चेंडू वेगात टाकण्याकडे माझे लक्षच नसते. मला शक्य तितके फलंदाजाला बाद करण्याकडे लक्ष असते. चेंडू टाकत असताना त्याच्या मागे वेग ठेवण्याची गरज असे हे माझ्या मनात कधीच नव्हते. मी आतापर्यंत जी काही गोलंदाजी केली ती नैसर्गिक होते. चेंडू वेगाने टाकायचा म्हणून कधीच गोलंदाजी केली नाही,” असे मयांकने सांगितले.