
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत स्पर्धा चालू ठेवणे योग्य राहणार नाही, असे BCCI च्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले.
गुरुवारी जम्मू आणि पठाणकोट येथे पाकिस्तानने हवाई हल्ले केल्याचा इशारा मिळाल्यानंतर धर्मशाला येथेही 'ब्लॅकआऊट' करण्यात आले होते. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पहिल्या डावातील १०.१ षटकांनंतर अर्धवटच रद्द करण्यात आला होता. तेव्हापासूनच आयपीएलच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
देश युद्धाच्या स्थितीत असताना क्रिकेट नाही
"देश युद्धाच्या स्थितीत असताना क्रिकेट सुरू ठेवणे योग्य ठरणार नाही," असे BCCI अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. आयपीएलचा अंतिम सामना कोलकात्यात २५ मे रोजी होणार होता, परंतु आता लीग पुढील सूचना होईपर्यंत रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा अनिश्चित काळासाठी निलंबित केल्यामुळे उर्वरित १२ साखळी सामने आणि ४ प्लेऑफ सामने योग्य वेळी खेळवले जातील, मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष कमी झाल्यावरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.
परदेशी खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण
आयपीएल सूत्रांच्या मते, युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण असून ते पुढील काही दिवसांत मायदेशी रवाना होणार आहेत. मागील वर्षीच्या मेगा-लिलावात १० संघांनी ६२ परदेशी खेळाडूंना करारबद्ध केले होते. "खेळाडू सुरक्षित आहेत, मात्र परिस्थिती पाहता त्यांच्या मनात चिंता आहे," असे एका IPL संघाच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
आजच्या LSG vs RCB सामन्याचं काय?
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचे खेळाडू सध्या धर्मशाला येथून दिल्लीकडे रस्ता मार्गे निघाले आहेत. शुक्रवारी लखनऊमध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार होता, पण तोही रद्द करण्यात आला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचेही परिस्थितीवर बारीक लक्ष
क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही भारत-पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असल्याचे स्पष्ट केले. न्यूझीलंडच्या खेळाडू संघटनेने देखील भारत-पाकिस्तानमधील असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आयपीएल इतिहासात प्रथमच युद्धजन्य परिस्थितीमुळे असा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान सुपर लीगलाही दोन्ही देशांमधील संघर्षाचा फटका बसला असून त्यांनी उर्वरित सामने युएईला हलवलेत.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाल्यानंतर भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सलग दोन दिवस भारतातील अनेक शहरांमध्ये हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. पण, भारताने सर्व हल्ले हाणून पाडले. दोन्ही देशांमधील संघर्ष सध्या कमालीचा वाढला आहे.