

धरमशाला : इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) रविवारी होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ पंजाब किंग्जच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा उठवून प्ले-ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल. धरमशालेच्या नयनरम्य स्टेडियमवर होणाऱ्या गेल्या सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली सर्वाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. विराट कोहलीची फलंदाजी पाहण्यासाठी दिल्ली आणि पंजाबमधून मोठ्या संख्येने चाहते या ठिकाणी दाखल झाले असून, येथील मर्यादित पायाभूत सुविधांवर त्याचा ताण पडत आहे. स्पर्धेत सातत्य राखणारा गतविजेता आरसीबी संघ पंजाब किंग्जविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पंजाबचा संघ सध्या सलग पाच पराभवांमुळे दबावाखाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत अग्रस्थानी असताना, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला सहावा पराभव पत्करावा लागल्यास त्यांचे प्ले-ऑफचे दरवाजे पूर्णपणे बंद होतील. या मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शेवटच्या पाच षटकांवर नियंत्रण न राखू शकल्याने पंजाबला २१० आणि २०० धावांच्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. आयपीएलच्या इतिहासात २०० हून अधिक धावा करूनही सर्वाधिक १० सामने गमावण्याचा नकोसा विक्रम पंजाबच्या नावावर आहे.
झेव्हियर बार्टलेट आणि मार्को यान्सेन संपूर्ण स्पर्धेत महागडे ठरल्याने पंजाबला आपल्या गोलंदाजीच्या रचनेत बदल करावा लागणार आहे. अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात कमी धावा देऊन आपला इकॉनॉमी रेट १० च्या आत आणला आहे, तर अझमतुल्लाह ओमरझाईने हंगामातील पहिल्याच सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये छाप पाडली आहे. मध्यम आणि डेथ ओव्हर्समध्ये आवश्यक नियंत्रणासाठी संघ विजयकुमार वैशाकचा पुन्हा संघात समावेश होऊ शकतो. पंजाबची फलंदाजी एकंदरीत चांगली झाली असली तरी गेल्या काही सामन्यांत ती पूर्ण क्षमतेने चाललेली नाही, मात्र गोलंदाजांनी संघाला वारंवार निराश केले आहे.
खेळपट्टीवर धरमशालेच्या आतापर्यंत वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली असून, मुंबई आणि पंजाबमधील सामन्यात ती काहीशी संथ गतीची होती. दुसरीकडे, आरसीबीचा संघ दमदार कामगिरी करत आहे. वयाच्या ३७ व्या वर्षीही विराट कोहलीने रायपूरमध्ये केकेआरविरुद्ध ६० चेंडूत १०५ धावा करून सातत्याची नवी व्याख्या तयार केली आहे. येथील परिस्थिती पाहता, आरसीबीच्या वेगवान गोलंदाजी विभागातील भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांना धरमशालेत गोलंदाजी करण्याचा आनंद मिळेल. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या टप्यावर संघासाठी योगदान देत आहे आणि हे चांगले संकेत आहेत, असे कर्णधार रजत पाटिदार याने सांगितले. गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणे, ही नेहमीच चांगली गोष्ट असून आम्ही एका वेळी एकच पाऊल पुढे टाकत असल्याचे पाटीदार याने नमूद केले.
धरमशालेत धावांचा पाऊस पडणार?
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे धरमशाळा येथील स्टेडियम हे देशातील सर्वात नयनरम्य क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानावर आयपीएल २०२६ मधील आतापर्यंतचे दोन्ही सामने धावांचा पाऊस पडणारे ठरले आहेत. दोन्ही सामन्यांत संघांनी अत्यंत सहजतेने २०० पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या म्हणजेच धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. यावरून जसजसा खेळ पुढे सरकतो, तसतशी ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल होत जाते, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आता दुपारच्या कडक उन्हात खेळपट्टी कशी साथ देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांना येथे मिळणारा फायदा पाहता, या सामन्यातही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), जॉर्डन कॉक्स, विराट कोहली, टिम डेव्हिड, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, । जेकब बेथल, कनिष्क चौहान, वेंकटेश अय्यर, विहान मल्होत्रा, मंगेश यादव, कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्ड, अभिनंदन सिंग, सात्विक देस्वाल, जेकब डफी, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, विकी ओस्तवाल, रसिक सलाम, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, रिचर्ड ग्लीसन.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवन, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.
सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून
Tags
Meta Keywords
URL Slug