महाराष्ट्र संघाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

महाराष्ट्र संघाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

सांगलीची १६ वर्षीय युवा वेटलिफ्टर काजल सरगरने पंचकुला येथे आयोजित चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत रविवारी चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकाविला. महाराष्ट्र संघाला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. सांगली शहरात चहाची टपरी लावत येणाऱ्या पैशातून मुलीच्या डाएटवर खर्च करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला वेटलिफ्टर काजलने जणू सोनेरी चकाकी मिळवून दिली. दरम्यान, सुमित बंडाळेने योगा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

‘खेलो इंडिया युथ गेम्स’मध्ये महाराष्ट्राने वेटलिफ्टिंग आणि योगा (पारंपरिक), सायकलिंग या क्रीडा प्रकारांतही सुवर्णपदके पटकावली. कबड्डीत मुला-मुलींचे दोन्ही संघ विजयी झाले. वेटलिफ्टिंगमध्ये सांगलीच्या काजल सरगरने महाराष्ट्राला सकाळीच पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. ताऊ देवीलाल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राने गाजवला. काजलने ४० किलो वजनगटात नैपुण्य दाखविले. या गटात तिने ११३ किलो वजन उचलले. स्नॅच या प्रकारात ५० आणि क्लिन अॅण्ड जर्क प्रकारात ६३ किलो वजन उचलले.

योगामध्ये तीन सुवर्ण

महाराष्ट्राच्या सुमित बंडाळे याला पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्ण पदक, आर्यन खरात व निबोध पाटील यांनी अर्टिस्टिक पेअरमध्ये सुवर्णपदक; तर वैदेही मयेकर व युगांका राजम यांनी अर्टिस्टिक योगासन प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळविले. एकूण तीन सुवर्णपदके योगासन प्रकारामध्ये महाराष्ट्राला मिळाली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in