Manu Bhaker: पदकाच्या हॅट्‌ट्रिकवर मनूचा डोळा; २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक; इशाकडून निराशा

नेमबाजीतील ‘कांस्य कन्या’ म्हणून उदयास आलेल्या भारताच्या मनू भाकरने शुक्रवारी तमाम देशवासीयांना आणखी एका पदकाचे स्वप्न दाखवले.
Manu Bhaker: पदकाच्या हॅट्‌ट्रिकवर मनूचा डोळा; २५ मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक; इशाकडून निराशा
Twitter
Published on

चेटेरॉक्स (पॅरिस) : नेमबाजीतील ‘कांस्य कन्या’ म्हणून उदयास आलेल्या भारताच्या मनू भाकरने शुक्रवारी तमाम देशवासीयांना आणखी एका पदकाचे स्वप्न दाखवले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आधीच दोन पदकांची कमाई केलेल्या २२ वर्षीय मनूला शनिवारी ऐतिहासिक तिसरे पदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने धडक मारली असून शनिवारी दुपारी १ वाजता अवघ्या भारताचे लक्ष मनूवर असेल. याच प्रकारात भारताची अन्य स्पर्धक इशा सिंगला मात्र अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले.

चेटेरॉक्स येथील राष्ट्रीय नेमबाजी केंद्रात झालेल्या या प्रकाराच्या अंतिम फेरीत मनूने ५९० गुणांसह दुसरे स्थान मिळवले. हंगेरीच्या वेरोनिका मेजरने ५९२ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. तिने ऑलिम्पिक विक्रमही नोंदवला. भारताच्या इशाला मात्र ५८१ गुणांसह १८व्या स्थानी समाधान मानावे लागले. आघाडीच्या ८ जणांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रिसिशन आणि रॅपिड राऊंडचा या प्रकारात समावेश आहे.

हरयाणाच्या मनूने गेल्या आठवड्यात प्रथम १० मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. त्यानंतर मिश्र सांघिक प्रकारात मनूने सरबजोत सिंगच्या साथीने कांस्यपदकाचा वेध साधला. भारतासाठी आजवर एकाही खेळाडूने तीन ऑलिम्पिक पदके जिंकलेली नाहीत. त्यामुळे मनूला ऐतिहासिक कामगिरी खुणावत असून शनिवारी ती अव्वल तिघांत स्थान मिळवून पुन्हा एकदा देशाला पदक जिंकून देईल, अशीच अपेक्षा आहे.

> भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन पदके जिंकली असून ही तिन्ही पदके नेमबाजीतील आहेत. त्यामुळे शनिवारी नेमबाजीतच भारताला पदकाचा चौकार लगावण्याचीही संधी आहे.

स्कीटमध्ये अनंतजीत २६व्या स्थानी

स्कीटमध्ये भारताच्या अनंतजीत सिंग नारुकाला पहिल्या दिवसअखेर २६व्या स्थानी समाधान मानावे लागले. अनंतजीतने ६८ गुण कमावले असून दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून सुधारणा अपेक्षित आहे. ट्रॅपमध्ये भारताचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. स्कीटमध्ये अद्याप दोन फेऱ्या शिल्लक असून त्यानंतर आघाडीचे सहा स्पर्धक अंतिम फेरीत दाखल होतील.

logo
marathi.freepressjournal.in