मुंबईच्या 'या' खेळाडूंना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जेतेपद

राज्यातील १४ जिल्ह्यांतील एकंदर ४०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.
मुंबईच्या 'या' खेळाडूंना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जेतेपद

मुंबईचा प्रशांत मोरे आणि काजल कुमारी यांनी बंगाल क्लब शताब्दीनिमित्त आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जेतेपद मिळवले.

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट सभागृह आणि बंगाल क्लब अशा दोन्ही ठिकाणी खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रशांतने मुंबईच्याच विकास धारियाला १८-९, १५-२५, १०-२५ असे तीन सेटमध्ये पराभूत केले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजलने मुंबईच्याच निलम घोडकेवर २५-६, २२-११ असे सरळ दोन सेटमध्ये वर्चस्व गाजवले. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी प्रशांतने मोहम्मद घुफ्रानवर १२-२५, २२-१५, २३-१५ अशी मात केली, तर काजलने अनुभवी संगीता चांदोरकर यांच्यावर २३-२२, २४-२१ अशी सरशी साधली.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील एकंदर ४०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये २४० पुरुष, तर ६० महिलांचा समावेश होता. स्पर्धेतील विजेत्यांना १ लाख १० हजारांची पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. त्याशिवाय स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in