सचिन नवी आशा, नीरजकडून प्रथमच निराशा! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे भालाफेकपटू अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानी, वॉलकोटला सुवर्णपदक

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी धक्कादायक ठरला. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला भालाफेकीच्या अंतिम फेरीत चक्क आठव्या स्थानी समाधान मानावे लागले.
सचिन नवी आशा, नीरजकडून प्रथमच निराशा! जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचे भालाफेकपटू अनुक्रमे चौथ्या आणि आठव्या स्थानी, वॉलकोटला सुवर्णपदक
Published on

टोकियो : जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी धक्कादायक ठरला. तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला भालाफेकीच्या अंतिम फेरीत चक्क आठव्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र सचिन यादवच्या रूपात भविष्याच्या दृष्टीने भारताचा नवा तारा उदयास आला. सचिनचे पदक थोडक्यात हुकल्याने त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. मात्र त्यापेक्षाही स‌र्वाधिक चर्चा रंगते आहे ती यावेळी प्रथमच देशवासीयांना निराश केलेल्या नीरजची.

१३ ते २१ सप्टेंबर या कालावधीत टोकियो येथे रंगणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे १९ खेळाडू सहभागी झाले आहेत. दर दोन वर्षांनी जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा जागतिक स्पर्धेचे २०वे पर्व आहे. २०२३मध्ये हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत भारताने एकमेव सुवर्णदपदकासह १८वा क्रमांक मिळवला होता. नीरजनेच भारतासाठी ते सुवर्ण जिंकले होते. यंदा भालाफेकीच्या अंतिम फेरीकडे नीरज विरुद्ध पाकिस्तानचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम यांच्यातील जुगलबंदी म्हणून पाहिले जात होते. मात्र दोघांनीही निराशा केली.

२७ वर्षीय नीरजला यावेळी सुवर्ण दूर, पण कांस्यपदकही जिंकण्यात अपयश आले. चार वर्षांपूर्वी ज्या टोकियोत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले, तेथून यावेळी नीरज रिकाम्या हातीच मायदेशी परतेल. पुरुष गटातील भालाफेकीच्या अंतिम फेरीत ८४.०३ मीटरच्या भालाफेकीसह नीरज यावेळी आठव्या क्रमांकावर राहिला. प्राथमिक फेरीत नीरजने ८४.८५ मीटर अंतर गाठून थाटात अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र गुरुवारी तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. नीरजने आतापर्यंत मिळवलेल्या यशाचा संपूर्ण देशाला अभिमान आहेच. मात्र गेल्या ७ वर्षांत प्रथमच नीरजला एखाद्या स्पर्धेत पदक मिळवता आलेले नाही, हेसुद्धा विशेष. त्यामुळे आता २०२६च्या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धांमध्ये नीरज नव्या जोमाने परतेल, अशी आशा आहे.

नीरजने गुरुवारी पहिल्या प्रयत्नात ८३.६५ मीटर, तर दुसऱ्या प्रयत्नात ८४.०३ मीटर अंतर सर केले. त्याचा तिसरा प्रयत्न फाऊल ठरला. चौथ्या वेळी नीरजने ८२.८६ मीटरवर भालाफेक केली, तर पाचवा प्रयत्न फाऊल गेल्यामुळे नीरज स्पर्धेबाहेर गेला. त्याला सहावा प्रयत्न देण्यात आला नाही. नीरजच्या चेहऱ्यावर त्याचे अपयश व निराशा दिसून येत होती.

प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात एक वाईट दिवस येतोच. नीरजचा दर्जा इतका वाढला आहे की, तो दुसऱ्या स्थानावर राहणे म्हणजे जणू पराभवच मानले जाते. तसेच नीरजच्या भोवती स्पर्धा वाढली असून अन्य देशांतील प्रतिस्पर्धीही तितक्याच तयारीने मैदानात उतरत आहेत. त्यामुळे नीरजला सातत्याने मेहनत घ्यावी लागणार आहे. मुख्य म्हणजे गुरुवारी अंतिम फेरीत नीरजला पाचपैकी एकाही प्रयत्नात ८५ मीटरहून पुढे भालाफेक करता आली. दुखापतीचे भय व तंदुरुस्ती या कारणास्तव नीरज कमी पडल्याची चर्चा आहे.

दरम्यान, नीरजने यावेळी निराशा केलेली असताना २५ वर्षीय सचिनने भरारी घेतली. ८६.२७ मीटरच्या भालाफेकीसह त्याने चौथे स्थान मिळवले. सचिनचे कांस्यपदक ०.४० सेंटीमीटरच्या फरकाने हुकले. विशेष म्हणजे सचिनने सहापैकी चार प्रयत्नांत ८४ मीटरच्या पुढे भालाफेक केली. पाकिस्तानचा अर्शद नदीम नीरजपेक्षाही खाली म्हणजेच १०व्या स्थानी राहिला. त्याला एकदाही ८३ मीटरपुढे भालाफेक करता आली नाही. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या केशोर्न वॉलकोटने ८८.१६ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्ण काबिज केले. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स (८७.३८) व अमेरिकेचा कुर्टिस थॉम्पसन (८६.६७) अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले.

क्रिकेट सोडून सचिन भालाफेकीकडे वळला अन्...

उत्तर प्रदेश येथे जन्मलेला सचिन यादव हा वयाच्या १८व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होता. त्याचे उत्तर प्रदेशच्या किशोर संघातही स्थान होते. मात्र नंतर वरिष्ठ संघात फारशी संधी न मिळाल्याने त्याने क्रिकेट थांबवले. यादरम्यानच त्याला भालाफेकीचे वेध लागले. वयाच्या १९व्या वर्षी सचिनने क्रिकेट सोडून भालाफेकीची निवड केली. आता ६ वर्षांनी सचिन भालाफेकीत भारताचे नवे आशास्थान म्हणून उदयास आला आहे.

नीरजची वर्षभरातील कामगिरी कशी?

नीरजने यापूर्वी २०२२च्या जागतिक स्पर्धेत रौप्य, तर २०२३च्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. यंदाच्या वर्षात नीरजला बहुतांश स्पर्धांमध्ये दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानी राहणाऱ्या नीरजने वर्षभरात फक्त गोल्डन स्पाईक व नीरज चोप्रा क्लासिक या स्पर्धा जिंकल्या. दोहा येथील डायमंड लीगच्या टप्प्यात नीरजने ९० मीटरचे अंतर गाठले होते. मात्र तेव्हा ही तो दुसऱ्या स्थानी राहिला. त्यामुळे जागतिक स्पर्धेतील पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजकडून पदकाची अपेक्षा सर्वांनाच होती.

आज काय झाले, हे मला कळलेच नाही. टोकियोत दाखल होण्यापूर्वी मला पाठदुखीचा त्रास जाणवत होता. मात्र तरी मी स्पर्धेत सहभागी होईन, याची खात्री होती. भालाफेक किती कठीण आहे, याची मला जाणीव झाली. माझे शरीर संकेत देत असतानाही मी जोखीम पत्करली. या अपयशातून सावरून लवकरच पुनरागमन करेन. हे अपयश मी मान्य करतो. प्रशिक्षकांसह देशातील चाहत्यांना मी निराश केले. मात्र पुढील वेळेस नक्कीच यश मिळवेन. - नीरज चोप्रा

जागतिक स्पर्धा @नीरज

  • २०२२ - रौप्यपदक

  • २०२३ - सुवर्णपदक

  • २०२५ - आठवे स्थान

२०१८

७ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८मध्ये नीरज ओस्त्रावा येथील काँटिनेंटल कप स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यावेळी नीरजला अव्वल तीन खेळाडूंत स्थान मिळवता आले नव्हते. त्या स्पर्धेत नीरज सहाव्या स्थानी होता. त्यानंतर तब्बल २,५५६ दिवसांनी नीरज एखाद्या स्पर्धेत अव्वल तीन खेळाडूंत नाही. यावरूनच नीरजच्या कामगिरीतील सातत्य अधोरेखित होते.

२०२१

२०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकपासून नीरज २५ स्पर्धांमध्ये सहभागी झाला. प्रत्येक स्पर्धेत तो सुवर्ण अथवा रौप्यपदक जिंकत आला. मात्र यावेळी ४ वर्षांनी प्रथमच नीरजचा अव्वल दोन भालाफेकपटूंमध्ये समावेश नाही.

वॉलकोटच्या यशात क्लॉस यांचा वाटा

नीरजने २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर प्रशिक्षक क्लॉस बार्टोनिझ यांच्या सोबतचा प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात आणला. त्याने चेक प्रजासत्ताकच्या ५९ वर्षीय झेलेझ्नी यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली. झेलेझ्नी यांच्या मार्गदर्शनात नीरजने ९० मीटरचे अंतर एकदा गाठले. मात्र त्यानंतर त्याची कामगिरी ढासळली. त्याचे तंत्र बदलले असून शरीराचे वजनही वाढलेले दिसते. त्याचवेळी नीरजचे पूर्वीचे प्रशिक्षक क्लॉस यांनी वॉलकोटला मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनात वॉलकोटने सुवर्ण पटकावले. म्हणजेच २०२३ व २०२५ या सलग दोन वर्षांत क्लॉस यांच्या शिष्याने जागतिक सुवर्ण जिंकले. फरक इतकाच की २०२३मध्ये तो शिष्य भारताचा नीरज होता, तर यावेळी त्रिनिदादचा वॉलकोट.

logo
marathi.freepressjournal.in