वन डे क्रिकेट जगायलाच हवे !

वन-डे क्रिकेटमुळेच क्रिकेट जगतात सुरुवातीला भारत, पाकिस्तानसह अनेक देशांना जगज्जेता म्हणून ऐटीत मिरवता आले
वन डे क्रिकेट जगायलाच हवे !

खरेच का वन-डे क्रिकेटचा फॉरमॅट कालबाह्य झाला आहे? फास्ट फूडचा जमाना असल्याने कालानुरूप टी-२० क्रिकेटची चटक लागलेल्या शौकिनांना ५० षट्कांचे वन-डे क्रिकेट पचनी पडेनासे झाले आहे का? अॅसिडिटी झाली म्हणून आपण विशिष्ट पदार्थ खायचेच बंद करावे का? काहीही म्हणा, तृप्तीचा ढेकर द्यायचा; तर प्लेटमधील नाश्त्यापेक्षा ताटातील पोटभर जेवणच हवे; फक्त ते रुचकर असायला हवे, इतकेच. आजार-विकार यावर आपण विचार करून उपाय योजतोच ना? मग का नाही प्रचलित वन-डे क्रिकेट फॉरमॅट काही सुधारणा घडवून जगविता येणार, लोकप्रिय करता येणार?

वास्तविक, ज्या फॉरमॅटपासून टी-२० सारख्या प्रचंड लोकप्रिय फॉरमॅटचा जन्म झाला, त्यालाच तिलांजली देणे हे घोर कृतघ्नपणाचे ठरेल. वन-डे क्रिकेटमुळेच क्रिकेट जगतात सुरुवातीला भारत, पाकिस्तानसह अनेक देशांना जगज्जेता म्हणून ऐटीत मिरवता आले. जगज्जेतेपद मिळविण्याआधी बलाढ्यांपुढे शरणागती, अशीच या देशांची मानसिकता होती. त्यांना लिंबूटिंबू म्हणून हिणवले जायचे. वन-डे फॉरमॅटमधील विश्वविजेतेपदामुळेच खरे तर भारत, पाकिस्तानसह श्रीलंकेलाही जिंकण्याचा आत्मविश्वास मिळविता आला. विश्वविजेतेपदामुळे या तिन्ही देशांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत क्रिकेट कमालीचे लोकप्रिय झाले. फुलले, उमलले. आता याच वन-डे फॉरमॅटपासून दिग्गज क्रिकेटपटू फारकत घेत आहेत. निवृत्ती पत्करत आहेत आणि काही तर हा फॉरमॅटच रद्द करण्याचे वक्तव्य करीत आहेत. वन-डे मालिकाही रद्द होत आहेत. हे क्लेषदायक आहे. तंदुरुस्तीचा मुद्दा असेल तर ते ‘ओक्के’ आहे; पण ज्यांची खेळण्याची इच्छाशक्ती आहे, त्यांच्यासाठी तरी वन-डे क्रिकेट तरायलाच हवे. काही माजी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपल्याने त्यापैकी काहींना खेळाच्या पुढील भवितव्याची चिंता नाही, असेच दिसते. वन-डे फॉरमॅटमधूनच टी-२० साठी खेळाडू मिळतील, याचे भान हा फॉरमॅट बंद करण्याची भाषा करणारे का ठेवत नाहीत?

दक्षिण आफ्रिकेने तर कहरच केला. त्यांच्या देशातील टी-२० फ्रँचायझी लीगच्या तारखांच्याच वेळीच ऑस्ट्रेलियातील वन-डे मालिका नियोजित असल्याचे लक्षात येताच, त्यांनी ही मालिकाच रद्द केली. आता बोला! दक्षिण आफ्रिकेकडे या दौऱ्यासाठी पर्यायी उदयोन्मुख खेळाडूही नव्हते का? देशांतर्गत लीगकडे प्रेक्षक पाठ फिरवतील, असे दक्षिण आफ्रिकी क्रिकेट मंडळाला वाटले का? आंतरराष्ट्रीय मालिकेमुळे प्रक्षेपण हक्क मिळाले असते, त्याचे काय? देशांतर्गत लीगमुळे जास्त अर्थसंपन्न होता येईल, असाही यामागचा ‘व्यवहार्य’ दृष्टिकोन असेल, कदाचित; परंतु नव्या प्रतिभेला उत्तेजन मिळण्याची नामी संधी हुकली, त्याचे काय? पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रम याने तर एकदिवसीय क्रिकेटचा फॉरमॅट चक्क बंद करायचे सुचवून खळबळ उडवून दिली आहे खरी; पण त्याच्या विधानाला गंभीर घेतलेच पाहिजे, असे नाही. खळबळ तर मुळीच माजता कामा नये. त्यापेक्षा आपल्या रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केलेल्या चिंतेबाबत संबंधितांनी विचार करावयास हवा. केवळ ‘आपला तो बाब्या’ म्हणून नव्हे तर त्याची कळकळ-तळमळ याची जरूर दखल घ्यावयास हवी. वन-डे क्रिकेटची लोकप्रियता कमी होत असल्याची खंत फिरकीपटू अश्विनने बोलून दाखविली. वन-डे क्रिकेट तो स्वतः पाहत नसल्याची कबुली त्याने दिली; पण हा फॉरमॅटच बंद करा, असे काहीच्या बाही तो बरळला नाही. उलट त्याने वन-डे क्रिकेटसाठी मोलाच्या काही सूचनाही केल्या. वन-डे क्रिकेट हा टी-२० क्रिकेटचा वाढलेला फॉरमॅट होता कामा नये, अशी व्यथा अश्विनने मांडली; पण हा फॉरमॅट बंद करण्याबाबत ‘ब्र’ही काढला नाही. अश्विनने सुचविले की, वन-डे क्रिकेटमध्ये एका डावात एकच चेंडू असला पाहिजे. फिरकीपटूंना फायदा होईल, असे चेंडूबाबतचे काही निर्णय घ्यावे लागतील. चेंडू रिव्हर्स स्विंग होण्यासाठी उपाय शोधावे लागतील. त्याने २०१० मध्ये जे चेंडू वापरले जात असत, ते वापरण्याचाही सल्ला दिला. अश्विनच्या या सूचनांमुळे फलंदाजी-गोलंदाजी यात समतोल साधला जाऊन चढ-उतार हे वन-डे क्रिकेटचे असलेले वैशिष्ट्य टिकण्यास मदत होऊ शकेल, खरोखरच. तेव्हा वन-डे क्रिकेटची लोकप्रियता घसरण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना केली पाहिजे. ‘उचलली जीभ लाविली टाळ्याला’ असे होता कामा नये. ज्यांना या वन-डे फॉरमॅटमध्ये खेळायचे नसेल, त्यांना जाऊ द्या खुशाल; पण ज्यांना ओढ आहे त्यांना खेळू द्या ना! बंद करण्याची निरर्थक अन‌् अथ्थक बडबड कशापायी?

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एकेकाळचा स्टार गोलंदाज अक्रमने वन-डे क्रिकेटचा फॉरमॅट जुना झाल्याचे तारे तोडले. अक्रमने एका मुलाखतीत सांगितले की, ‘‘मला वाटते आता एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅट बंद केला पाहिजे. इंग्लंडमध्ये स्टेडियम खचाखच भरलेले असतात; पण भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय सामन्यादरम्यान स्टेडियम रिकामी असतात. फक्त नावासाठी वन-डे क्रिकेट खेळवले जात आहे. हा फॉरमॅट आता जुना झाला आहे. स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणे धक्कादायक आहे. मी त्याच्यासोबत आहे. एक समालोचक म्हणून एकदिवसीय फॉरमॅट ओढूनताणून खेचल्यासारखा वाटत आहे.’’

अक्रम महोदय म्हणतात त्याप्रमाणे वन-डे फॉरमॅट ओढूनताणून खेचल्यासारखा वाटत असेल तर अश्विनने सुचविल्याप्रमाणे वन-डे फॉरमॅटला रंजक करण्याचे उपाय शोधायला हवेत. लोकप्रिय ठरू शकणारे बदल त्यात केले पाहिजेत. काही पर्यायसुद्धा आजमावून पाहता येतील. दोन डावाऐवजी कसोटी क्रिकेटप्रमाणे प्रत्येकी किमान दहा-बारा षट्कांचे चार डाव खेळविल्यास चौथ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचा धावांचा पाठलाग चित्तथरारक ठरू शकेल. पहिल्या डावात कोणता संघ आघाडी घेतो, याचीही उत्सुकता निर्माण होईल. खेळ कंटाळवाणा होऊ नये म्हणून यासारख्या अनेकविध पर्यायांचा संबंधितांना सखोल विचार करून व्यवहार्य निर्णय घेण्यास तसा मोठा वाव आहे. कसोटी क्रिकेटमधील डावपेचांबाबत स्वारस्य निर्माण होत असल्याने जसे या फॉरमॅटला अलीकडे सुगीचे दिवस आले आहेत, तसे मग वन-डे फॉरमॅटलाही येऊ शकतील, खचितच.

शिवाय, अर्थार्जनाचा मुद्दासुद्धा अक्रम कसे काय विसरले? केवळ स्टेडियमवरील उपस्थिती अर्थप्राप्ती करून देत नसते. प्रक्षेपणाचे अधिकारच पैशांचा पाऊस पाडत असतात, याचेही स्मरण करून द्यावे लागावे ना! केवळ प्रेक्षकांच्या उपस्थितीवरून लोकप्रियता जोखता येणार नाही. काही प्रेक्षकांना इच्छा असूनही अपुऱ्या मूलभूत सोयी-सुविधांअभावी मोठ्या कालावधीच्या फॉरमॅटसाठी बायको-लेकरांसह सहकुटुंब स्टेडियमवर जाता येत नाही. असे प्रेक्षक मग दुधाची तहान ताकावर म्हणजे टीव्हीवरील थेट प्रक्षेपणावर भागवितात. सच्चे शौकीन आपल्या सवडीनुसार अधूनमधून का होईना, वन-डे क्रिकेट पाहतच असतात. म्हणूनच स्टेडियम रिकामे दिसले, यावरून लोकप्रियता घसरली, असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. तेव्हा स्टेडियम खचाखच भरण्यासाठी मूलभूत सोयी-सुविधांबरोबरच प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या बक्षीस योजना किंवा तत्सम उपक्रम स्टेडियमवर राबविले गेले पाहिजेत. वन -डे फॉरमॅट टिकला तर उदयोन्मुख खेळाडूंना संधी उपलब्ध होऊन ते टी-२० फॉरमॅटसाठी तयार होऊ शकतील. इतकेच नव्हे, तर अक्रम यांच्यासारख्या समालोचकांना पैसे घेऊन सवंग बडबड करण्याची नामी संधीही मिळेल, आपसुकच. टी -२० फॉरमॅट जेमतेम चार तासांत संपत असल्याने चॅनेलवर जाहिरातींसाठी मिळणारा वेळही तसा तोकडाच म्हणावा लागेल. पैसा खोऱ्याने नव्हे, तर बॅटने ओढण्यासाठी टी -२० फॉरमॅट तसा अल्पायुषीच आहे, म्हणा ना! मोठा फॉरमॅटच जास्त अर्थार्जनाची संधी निर्माण करू शकतो आणि अधिकाधिक जाहिरातींना जास्तीत जास्त वेळ मिळण्याचे साधन ठरू शकतो. रोजंदारीवरील गरजूंना जास्त कालावधीसाठी रोजगार उपलब्ध करू शकतो. तेव्हा अनेकांच्या रोजीरोटीसाठीदेखील वन-डे फॉरमॅट जगलाच पाहिजे. तेव्हा ‘तुम जियो हजारो साल...’ अशाच शुभेच्छा वन-डे क्रिकेट फॉरमॅटला सर्वांनी आवर्जून दिल्या पाहिजेत, निश्चितच.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in