पाकिस्तानचा इंग्लंडवर अवघ्या तीन धावांनी चित्तथरारक विजय; हरिस राउफ सामनावीर

पाकिस्तानचा इंग्लंडवर अवघ्या तीन धावांनी चित्तथरारक विजय; हरिस राउफ सामनावीर

पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या.

सात सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडवर अवघ्या तीन धावांनी चित्तथरारक विजय मिळविला. तिसरा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानने या विजयासह मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. पुढील सामना २८ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३२ धावांच्या मोबदल्यात तीन बळी टिपणाऱ्या पाकिस्तानच्या हरिस राउफला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ४ बाद १६६ धावा केल्या. त्यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचर संघ १९.३ षटकांत १६३ धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून हरिस राउफ आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी तीन विकेट‌्स घेतले. मोहम्मद हसनैनला दोन बळी मिळाले. वसीमने एक फलंदाज बाद केला. विजयासाठी लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर फिल साल्ट अवघ्या आठ धावांवर बाद झाला. नवाझने त्याला वासिमच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात अ‍ॅलेक्स हेल्सने मोहम्मद हसनैनचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने तटविला. चेंडू हवेत असतानाच उस्मान कादिरने शॉर्ट मिडविकेटवरून उडी मारून अप्रतिम झेल टिपला. हेल्स केवळ पाच धावा करून परतला. या विकेटमुळे इंग्लंडवर सुरुवातीपासूनच दबाव वाढला.

हेल्स बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या अवघी १३ होती. त्यानंतर एका धावेची भर पडते न पडते तोच तिसरा फलंदाज बाद झाला. विल जॅक्सला भोपळाही फोडू देका हसनैनने त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ४ बाद ५७ अशी झाली. त्यानंतर विशिष्ट अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद झाले.

इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक (२९ चेंडूंत ३४) आणि बेन डकेटने (२४ चेंडूंत ३३) आणि कर्णधार मोईन अलीने (२० चेंडूंत २९) धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (२८ चेंडूंत ३६) आणि मोहम्मद रिझवान (६७ चेंडूंत ८८) यांनी ९७ धावांची सलामी दिली. इंग्लंडच्या रीस टॉपलीने ३७ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट्स मिळविल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in