राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार खेळाडूंशी संवाद

देशवासीयांकडून प्रोत्साहन देण्याची सुरुवात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार खेळाडूंशी संवाद

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात २८ जुलैपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेआधी बुधवार, २० जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. देशवासीयांकडून प्रोत्साहन देण्याची सुरुवात स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. भारतीय पथकासोबत ते चर्चा करून त्यांचा उत्साह वाढविणार आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा संवाद होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) देण्यात आली. यात ॲथलीटसह त्यांचे कोचही सहभागी होणार आहेत. खेळाडूंचा उत्साह वाढवणे, त्यांना प्रेरणा देणे हा या संवादामागचा मुख्य हेतू आहे, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पीएमओने स्पष्ट केले की, अनेकदा पंतप्रधान मोदींनी स्वत: खेळाडूंना व्यक्तिगत फोन करून यशासाठी आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आहे. त्याशिवाय भारतीय पथक मायदेशी परतल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी ॲथलीटसोबत टोकियो ऑलिम्पिकआधी चर्चा केली होती. मागील वर्षी पंतप्रधान मोदींनी भारतीय ॲथलीटच्या पथकासह टोकियो पॅरालिम्िपक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसोबतही चर्चा केली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ८ ऑगस्टपर्यंत असणार आहे. एकूण २१५ ॲथलीट १९ क्रीडा प्रकाराच्या १४१ स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताने मागील वर्षी ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे एकूण ६६ पदके जिंकून तिसरे स्थान मिळविले होते. भारताने राष्ट्रकुलमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत केली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in