IPL 2026, PBKS vs MI : पंजाबला आज सूर गवसणार? सलग चार पराभवांनंतर विजयपथावर परतण्याचे आव्हान; मुंबईशी लढत

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जकडे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र गेल्या चार सामन्यांतील सलग पराभवांमुळे हा संघ आता बाद फेरीतही दाखल होईल की नाही, याविषयी संभ्रम आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुरुवारी पंजाबची आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सशी गाठ पडणार आहे.
IPL 2026, PBKS vs MI : पंजाबला आज सूर गवसणार? सलग चार पराभवांनंतर विजयपथावर परतण्याचे आव्हान; मुंबईशी लढत
IPL 2026, PBKS vs MI : पंजाबला आज सूर गवसणार? सलग चार पराभवांनंतर विजयपथावर परतण्याचे आव्हान; मुंबईशी लढतX
Published on

धरमशाला : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जकडे यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र गेल्या चार सामन्यांतील सलग पराभवांमुळे हा संघ आता बाद फेरीतही दाखल होईल की नाही, याविषयी संभ्रम आहे. धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुरुवारी पंजाबची आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबई इंडियन्सशी गाठ पडणार आहे. त्यामुळे आता तरी पंजाबला सूर गवसणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.

२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. बहुतांश लढतींमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. मात्र गेल्या काही दिवसांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीही बाजी मारली आहे. त्यामुळे बॅट-बॉलमधील द्वंद्व रंगतदार होत आहे. नाणेफेकीच्या कौलावर विसंबून न राहता कोणत्याही क्षणी सामन्यांची दिशा बदलत आहे. प्रत्येक लढतीनंतर गुणतालिकेचे समीकरण आणखी रंजक होत आहे.

दरम्यान, पंजाबने सुरुवातीच्या सातपैकी सहा लढती जिंकल्या होत्या. तसेच एका रद्द लढतीमुळे त्यांच्या खात्यात ७ सामन्यांत १३ गुण जमा होते. मात्र राजस्थान, गुजरात, हैदराबाद व दिल्ली यांच्याविरुद्ध पंजाबच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे ते सध्या ११ सामन्यांतील १३ गुणांसह चौथ्या स्थानी घसरले आहेत. पंजाबला बाद फेरीतील प्रवेश पक्का करण्यासाठी उर्वरित तीनपैकी किमान २ लढती जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच मुंबईविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी निर्णायक असेल.

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य व श्रेयस या त्रिकुटावर पंजाबची फलंदाजी अवलंबून आहे. मधल्या फळीत मार्कस स्टोइनिस व शशांक सिंग यांना छाप पाडता आलेली नाही. गोलंदाजीत अर्शदीप सिंग व मार्को यान्सेन यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आढळत आहे. तसेच फिरकीपटू युझवेंद्र चहलचा वापर पंजाबचा संघ धरमशाला येथे कसा करणार, याकडे लक्ष असेल.

दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला गेल्या लढतीत बंगळुरूकडून शेवटच्या चेंडूवर निसटता पराभव पत्करावा लागला. मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून हार्दिक पंड्या या लढतीसही मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईचा संघ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देऊ शकतो. रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमरा व स्वत: सूर्यकुमार या सर्वांनाच यंदाच्या हंगामात लौकिकानुसार कामगिरी करता आली नाही. मात्र पंजाबचे गणित बिघडवण्यासाठी हा संघ उत्सुक असेल. कॉर्बिन बोश व अल्लाह गझनफर या विदेशी खेळाडूंनी मात्र मुंबईसाठी चमक दाखवली आहे. नमन धीर व रायन रिकल्टनवर फलंदाजीत मदार असेल.

खेळपट्टीचा अंदाज

बुधवारी धरमशाला येथे पावसामुळे खेळाडूंच्या सराव सत्रावर परिणाम झाला. गुरुवारीसुद्धा पावसाचे सावट असेल. दिल्ली-पंजाब लढतीत दोन्ही संघांनी फक्त वेगवान गोलंदाजांचाच वापर केला. या लढतीतही वेगवान गोलंदाजांना अधिक सहाय्य लाभण्याची शक्यता आहे.

उभय संघांत आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. त्यांपैकी पंजाबने १८, तर मुंबईने १७ लढती जिंकल्या आहेत. तसेच पंजाबने यंदा मुंबईला वानखेडेवर नमवले होते. त्यामुळे मुंबई त्या पराभवाचा वचपा घेणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

प्रतिस्पर्धी संघ

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यर (कर्णधार), अर्शदीप सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, बेन ड्वारशुइस, कूपर कोनोली, हर्नूर पन्नू, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, मार्को यान्सेन, मार्कस स्टोइनिस, मुशीर खान, नेहल वधेरा, प्रभसिमरन सिंग, प्रवीण दुबे, प्रियांश आर्य, प्याला अविनाश, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, विजयकुमार वैशाख, विशाल निशाद, विष्णू विनोद, झेव्हियर बार्टलेट, यश ठाकूर, युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, कॉर्बिन बोश, दानिश मलेवार, दीपक चहर, मयांक मार्कंडे, मयांक रावत, मोहम्मद इझार, नमन धीर, क्विंटन डीकॉक, रघू शर्मा, राज बावा, रॉबिन मिन्झ, रायन रिकल्टन, शार्दूल ठाकूर, शर्फेन रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, क्रिश भगत, केशव महाराज.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in