पाकिस्तानात खेळण्यास नकारच; बीसीसीआयचे आयसीसीला स्पष्ट पत्र; भारताचे सामने दुबईत आयोजित करण्याची मागणी

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्राद्वारे कळवले असून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे समजते. त्याशिवाय भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्याची मागणीसुद्धा बीसीसीआयने केली आहे.
पाकिस्तानात खेळण्यास नकारच; बीसीसीआयचे आयसीसीला स्पष्ट पत्र; भारताचे सामने दुबईत आयोजित करण्याची मागणी
Published on

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासंबंधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पत्राद्वारे कळवले असून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे समजते. त्याशिवाय भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्याची मागणीसुद्धा बीसीसीआयने केली आहे.

२००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. उभय संघ फक्त आयसीसी स्पर्धा तसेच आशिया चषकात आमनेसामने येतात. तसेच २०१२नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात एखादी मालिकासुद्धा झालेली नाही. त्यामुळेच मार्च २०२५मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाणार की नाही, याविषयीचा निर्णय केंद्र शासन घेईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे २०२३च्या आशिया चषकाप्रमाणेच चॅम्पियन्स ट्रॉफीचेसुद्धा संमिश्र प्रारुपात (हायब्रीड मॉडेल) आयोजन करण्यात यावे, असे बीसीसीआयने सुचवले आहे. २०२३च्या आशिया चषकात भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले. तर पाकिस्तानचा संघ काही लढती त्यांच्या देशात खेळला.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत विश्वातील अव्वल आठ संघांचा सहभाग असेल. एकदिवसीय प्रकारात होणारी ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत रंगणार असून सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे नियोजित आहेत. वेळापत्रकानुसार भारतीय संघ १ मार्च रोजी लाहोर येथे पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. मात्र, पाकिस्तानात न खेळण्यावर ‘बीसीसीआय’ ठाम असून याबाबत त्यांनी सरकारचा सल्लाही घेतल्याचे समजते.

“ही एक आयसीसी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाशी निगडीत कोणताही निर्णय बदलण्याचे अधिकार आयसीसीाला आहेत. केंद्र शासनाने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघाला पाकिस्तानात न जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बीसीसीआयने यासंबंधी आयसीसीला पत्र सुपूर्द केले आहे. स्पर्धेसाठी १०० दिवस शिल्लक असेपर्यंत आयसीसी यजमानपदामध्ये फेरफार करू शकते,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हे प्रकरण आणखी रंगतदार झाले आहे.

नक्वी यांचा विरोध कायम

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहनीस नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे संमिश्र प्रारुपात आयोजन करण्यास विरोध द‌र्शवला आहे. तसेच भारताने आयसीसीला पत्र दिले असले, तरी आम्हाला अद्याप आयसीसीकडून त्याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, असे नक्वी यांनी सांगितले. “चॅम्पियन्स ट्रॉफी दोन देशांत खेळवण्याबद्दल माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही. तसेच याविषयी मी कोणाशीही चर्चा करण्यास उत्सुक नाही. ही स्पर्धा आयोजित करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही हा मान सहज गमावणार नाही,” असे नक्वी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in