आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजयारंभ; पाकिस्तानवर पाच गडी राखून मात

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने डावाची सुरूवात आश्वासक केली
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजयारंभ; पाकिस्तानवर पाच गडी राखून मात

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच गडी राखून नमवत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा विजयारंभ केला. पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. हार्दिक पंड्याने (१७ चेंडूंत नाबाद ३३) लाँग ऑनच्यावरून षटकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी ३५ धावांचे योगदान दिले. गोलंदाजीतही हार्दिकने तीन बळी मिळवले. तर भुवनेश्वर कुमारने भारताकडून सर्वाधिक चार बळी मिळवून छाप पाडली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने डावाची सुरूवात आश्वासक केली. मात्र भुवनेश्वर कुमारने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले. बाबरचा झेल अर्शदीप सिंगने टिपला. बाबरला अवघ्या १० धावा करता आल्या.

बाबर आझम बाद झाल्यानंतर फकर झमान आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आवेश खानने फकर झमानला कार्तिकच्या हाती सोपविले. झमान दहा धावांवर बाद झाला. त्यांनतर सलामीवीर मोहम्मद रिझवानने इफ्तिकार अहमदसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी पाकिस्तानला १० षटकात ६८ धावांपर्यंत पोहोचविले. ही जोडी जमणार असे वाटत असतानाच हार्दिक पांड्याने इफ्तिकारला बाऊन्सरवर बाद केले. इफ्तिकारने २२ चेंडूत २८ धावांची खेळी केली. त्याचा झेल कार्तिकने टिपला. त्याने रिझवानसोबत तिसऱ्या विकेटसाठीची ४५ धावांची भागीदारी केली. हार्दिकने पंधराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर खुशदील शाहला दोन धावांवर बाद केले.

हार्दिकने आपल्या स्पेलमध्ये सातत्याने ताशी १४० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करीत शॉर्ट बॉलचा खुबीने वापर केला. भुवनेश्वर कुमारने सतराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफ अलीला ९ धावांवर बाद केले. त्याचा झेल यादवने टिपला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in