
मुंबईचा फलंदाज सर्फराज खानने १४० चेंडूंत धडाकेबाज शतक झळकविताना ११ चौकार आणि दोन षट्कार लगावले. तो या रणजी हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. सरफराजने आतापर्यंत ६००हून अधिक धावा केल्या आहेत. याबरोबरच सर्फराज प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा करण्याच्या सरासरीबाबत सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत जाऊन बसला. त्याचा सध्याचा फॉर्म आणि कामगिरी पाहता लवकरच त्याची भारतीय संघात वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्फराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करताना त्याची सरासरी ८०पेक्षा जास्त होती. सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९५.१४ च्या सरासरीने पहिल्या दोन हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सर्फराजचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. गेल्या पाच डावांमध्ये त्याने १५६च्या सरासरीने ६२४ धावा केल्या आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सात सर्व शतकांमध्ये १५०पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला. सर्फराजने रणजी करंडक स्पर्धेमध्ये गेल्या १३ डावांमध्ये सहा शतके झळकावली आहेत. यामध्ये एक त्रिशतक, तीन द्विशतके, पाच वेळा १५०हून अधिक धावा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.