ओव्हल : सलामीवीर पथुम निसांकाने १२४ चेंडूंत साकारलेल्या नाबाद १२७ धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे श्रीलंकेने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून वर्चस्व गाजवले. मात्र या पराभवानंतरही इंग्लंडने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
२१९ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने चौथ्या दिवशीच ४०.३ षटकांत गाठले. निसांकाने १३ चौकार व २ षटकारांसह कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक साकारले. त्याला कुशल मेंडिस (३९) आणि अँजेलो मॅथ्यूज (नाबाद ३२) यांनी सुरेख साथ दिली. निसांका व मॅथ्यूजने तिसऱ्या विकेटसाठी १११ धावांची अभेद्य भागीदारी रचून श्रीलंकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निसांकाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तर ३ सामन्यांत सर्वाधिक ३७५ धावा करणारा जो रूट मालिकावीर ठरला.
या कसोटीत पहिल्या डावात ओली पोपच्या शतकामुळे इंग्लंडने ३२५ धावा केल्या. मग श्रीलंकेला त्यांनी २६३ धावांत रोखले. मात्र इंग्लंडचा दुसरा डाव १५६ धावांतच आटोपला. लाहिरू कुमारा व विश्व फर्नांडो यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. त्यामुळे श्रीलंकेपुढे २१९ धावांचे आव्हान उभे राहिले. निसांकाच्या शतकामुळे त्यांनी ते सहज गाठले.
श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्येच अवघा चौथा कसोटी सामना जिंकला. यापूर्वी १९९८ (ओव्हल), २००६ (ट्रेंट ब्रिज) आणि २०१४ (हेडिंग्ले) या वर्षी त्यांनी अशी कामगिरी नोंदवली होती.