
एकदिवसीय मालिकेत निर्भेळ यश संपादन केल्यानंतर आता शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेवरही कब्जा करण्याकरिता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सज्ज झाली आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी अवघे तीन महिने शिल्लक असताना रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना अंतिम संघ तयार करण्यासाठी १६ टी-२० सामने मिळणार आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना संधी देऊन वर्ल्डकपसाठीचा संघ तयार करण्याचे आव्हान या दोघांवर असेल.
अंतिम ११ जणांच्या संघात रोहित, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक या पाच फलंदाजांचे स्थान निश्चित असले तरी अन्य सहा खेळाडूंचा शोध भारतीय संघाला घ्यावा लागणार आहे. विराट कोहलीसारख्या अव्वल खेळाडूचा फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. खराब फॉर्ममुळेच विराटचे अंतिम संघातील स्थान डळमळीत झाले आहे.
हुडामुळे कोहलीच्या स्थानाला धक्का?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेनंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला की नाही, हे स्पष्ट होईल. दीपक हुडाला मोजक्याच टी-२० सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली असून आयर्लंडविरुद्ध झळकावलेले शतक हे कोहलीसाठी डोकेदुखी ठरू शकते. ऑफब्रेक गोलंदाजीने त्याने विंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत छाप पाडली तर हुडा की कोहलीला संधी द्यायची, हा प्रश्न कर्णधार रोहितसमोर उभा राहू शकतो.