भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार ३१ जुलैला अनुभवण्यास मिळणार

स्पर्धेत ७२ देशांतील सुमारे चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार ३१ जुलैला अनुभवण्यास मिळणार

येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवण्यास मिळणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवार, ३१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे.

स्पर्धेत ७२ देशांतील सुमारे चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत. १९९८च्या हंगामात क्वालालंपूर येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता; मात्र त्यानंतर पुन्हा या स्पर्धेत क्रिकेट खेळवणे शक्य झाले नाही. आता प्रथमच बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ क्रिकेट संघ स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांचे दोन गटांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस ‘अ’ गटामध्ये आहे. तर, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका ‘ब’ गटामध्ये आहेत.

या दोन्ही गटातील पहिल्या दोन स्थानांवर असणारे संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील पहिला क्रिकेट सामना २९ जुलै रोजी होणार आहे. सर्व सामने बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी सुवर्ण आणि कांस्यपदकांचे सामने खेळविले जातील.

भारत, पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नसल्यामुळे दोन्ही संघाची गाठ फक्त आयसीसीच्या क्रिकेट स्पर्धांमध्येच पडत असते. आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ पुन्हा आमने-सामने येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून स्मृती मंधानाकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in