ट्रायल अॅन्ड एरर्स

पौराणिक कथांमधील राजा विक्रमादित्याप्रमाणे टीम इंडियातील धोरणनिर्माते आपला हट्ट सोडायला काही तयार नाहीत.
ट्रायल अॅन्ड एरर्स

सर्वांचे लक्ष लागून राहिलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा आता अगदी जवळ येऊन ठेपलेली असतानाही टीम इंडिया मात्र अद्याप प्रयोगशाळेतच अडकून पडल्याचे दिसत आहे. ‘आता बास झाले ना राव प्रयोग’, असे भलेभले क्रिकेट पंडित घसा ताणून आणि लेखण्या परजून सांगत असतानाही विक्रम आणि वेताळ यांच्या पौराणिक कथांमधील राजा विक्रमादित्याप्रमाणे टीम इंडियातील धोरणनिर्माते आपला हट्ट सोडायला काही तयार नाहीत. त्यातच या विलक्षण प्रयोगशीलतेच्या अट्टाहासात अकल्पक आणि अव्यवहार्य नियोजनाचीही भर पडली आहे, खरोखरच. म्हणजे, ‘ट्रायल अॅण्ड एरर्स’च्या तव्यावर पुन्हा क्रिकेटशौकिनांचा भेजाफ्राय करणारी बिनडोक फोडणीच म्हणा ना!

वास्तविक, एव्हाना प्रत्येक फलंदाजांचे मैदानावर उतरण्याचे क्रमांक निश्चित व्हायला हवे होते. प्रत्येक गोलंदाजांच्या जबाबदाऱ्या ठरायला हव्या होत्या. अगदी क्षेत्रव्यूहासाठीदेखील प्रत्येक खेळाडूंच्या जागा पक्क्या व्हायला हव्या होत्या. त्यामुळे टी-२० विश्वचषकाआधी जे काही सामने खेळायला मिळणार आहेत, त्यात प्रत्येक खेळाडूचा आपसूकच सराव होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढला असता. आपल्याला नेमके काय करायचे आहे, यावर लक्ष केंद्रित करून त्यांना अभ्यासपूर्ण नियोजन करता आले असते. यामुळे खेळाडू मानसिकदृष्ट्या खंबीर झाले असते; पण ‘कशात काय अन‌् फाटक्यात पाय’ अशीच टीम इंडियाची अवस्था झाली आहे, जणू.

अपयशी ठरलेल्या खेळाडूला पाठिंब्याचे ‘आधार कार्ड’ दाखवून त्याच्यावर विश्वास व्यक्त करण्याची ही वेळ असताना अशा खेळाडूला पर्याय शोधण्याचा धाक दाखवत ‘रेडकार्ड’चा इशारा कशापायी? त्यातच जे खेळाडू टी -२० संघाचा भाग नाहीत, त्यांना इतरांचा हक्क डावलत नाहक खेळवून निष्कारण सराव देण्याचा रडीचा डाव तरी कशासाठी? टीम इंडियाच्या या ट्रायल ॲण्ड एरर्सचा प्रकार अक्षरश: खेळाडूंसाठी ‘हॉरर’ आहे ‘हॉरर’! कारण या हॉरिबल धोरणांमुळे कोणालाच संघातील आपल्या स्थानाबाबत खात्रीशीर शाश्वती राहिलेली नाही.

तिकडे शेजारचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि क्रिकेट या खेळाचे जनक इंग्लंड पाहा जरा डोकावून! कसे कल्पकतेने नियोजनबद्ध सराव करीत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या कल्पनाशून्य नियोजनावर गालातल्या गालात ते हसतही असतील, कदाचित. ‘आगे निकल आए हम, वो पीछे रह गये...’ अशीच त्यांची भावना झाली असेल. ‘वो हमसे हारेंगे, हम बाजी मारेंगे, हम उनसे क्या हैं कम, नाचेंगे ऐसे हम, नाचेंगे ऐसे हम, नाचेंगे वो क्या?’ असा आत्मविश्वास त्यांच्यात संचारला असेल. कारण वन-डेच्या नव्हे; तर टी -२० च्या विश्वचषकासाठी सराव करायचा असल्याचे भान ठेवत पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी उभयपक्षी तब्बल सात टी-२० सामन्यांचे आयोजन केले आहे. आता बोला! आणि आपण? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आधी तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि नंतर तीन सामन्यांची वन-डे मालिका आयोजित केली आहे. वन-डे मालिकेत टी-२०च्या विश्वचषक संघातील खेळाडू नसतील, हे गृहित धरले, तरी याच वन-डे मालिकेऐवजी सरसकट सहा सामन्यांची टी-२० मालिका आयोजित केली असती, तर ते व्यवहार्य ठरले असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियात जादा सराव सामन्यांच्या नियोजनाचा आटापिटा टळला असता. तीन जादा टी-२० सामन्यांमध्ये आपसूकच खेळाडूंना सराव मिळाला असता. टी-२० वर्ल्डकपच्या ऐन तोंडावर वन-डे मालिकेच्या आयोजनाला दक्षिण आफ्रिकी व्यवस्थापनाने समर्थन द्यावे, हेही आश्चर्यकारकच! जर वन-डे मालिकेत टी-२०च्या विश्वचषक वारीला जाणारे खेळाडू खेळले, तर मात्र ते भूगोलाच्या परीक्षेला इतिहासाचा अभ्यास करून जाण्यासारखाच अजब-गजब हास्यास्पद प्रकार ठरेल.

पूर्वी दहावीच्या परीक्षेत वारंवार नापास होण्याला उपहासाने बरेच जण वारीची उपमा देत असत. टीम इंडियात असेच ‘ट्रायल अॅण्ड एरर्स’चे प्रकार होत राहिले तर विश्वचषकासाठी टीम इंडियाला असेच वाऱ्या करीत राहावे लागेल, याचे भान संबंधितांनी ठेवले पाहिजे. उगाच चमत्कारिक भानामती केल्याप्रमाणे जादू घडून येण्याच्या अपेक्षेने होणारे प्रयोग आता थांबविले पाहिजेत; अन्यथा भारताने कधी काळी दोन वन-डे आणि दोन टी-२० विश्वचषक मिळविले होते, या इतिहासातच वर्षानुवर्षे रमत बसावे लागेल, खचितच. टी-२० क्रिकेटमधील अव्वल संघांपैकी एक अशी ख्याती असलेल्या टीम इंडियाची सध्याची कामगिरी सध्या अतिशय चिंताजनक होत आहे. धरसोड धोरणामुळे भारताला वारंवार पराभव पत्करावा लागत आहे. भारत गेल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठण्यातही अपयश आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्येदेखील पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता कोणत्याच विश्वचषकात टीम इंडियाकडून अपेक्षा नसल्याचे मत व्यक्त करण्याचे धाडस काही तथाकथित विश्लेषकांनी केले. त्यांना खोटे ठरवायची ईर्षा मनी बाळगणे जरुरीचे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. ‘बैल गेला नि झोपा केला’, असे कदापि होऊ देता कामा नये. आशिया चषक स्पर्धेत सुपर फोरच्या सामन्यात २२ वर्षीय रवी बिश्नोई या गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला होता. बिश्नोईने बऱ्यापैकी कामगिरी केली होती. किफायती गोलंदाजी केली होती. अगदी पॉवरप्लेमध्येसुद्धा प्रभावी गोलंदाजी केली होती. डेथ ओव्हरमध्येही त्याने फलंदाजांची गाळण उडविली होती; मात्र त्यानंतर पुढच्याच सामन्यात या गुणवान खेळाडूला अंतिम ११मधून आश्चर्यकारकरीत्या वगळण्यात आले. अशाने संघात राहणार की जाणार, अशाच विवंचनेत पडलेला खेळाडू सातत्य कसे टिकवू शकणार? ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही बिश्नोई संघाचा भाग नाही. टी-२० विश्वचषक संघात त्याला ‘राखीव’ ठेवण्यात आले आहे. या उदयोन्मुख खेळाडूची लय बिघडल्यास जबाबदार कोण? गेल्या काही महिन्यांत टीम इंडियात अनेक अनाकलनीय प्रयोग झाले आहेत. तीन वर्षांपासून बाहेर असलेल्या उमेश यादवची संघात निवड हा त्यातलाच एक भुवया उंचावणारा अनपेक्षित प्रयोग. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त किंवा अनुपलब्ध असेल तर उदयोन्मुख खेळाडूंना पसंती देणेच इष्ट ठरते; पण मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने तब्बल ३४ वर्षीय वेगवान गोलंदाज उमेश यादवचे पुनरागमन म्हणजे हुंदडण्याच्या वयात भजन करण्यासारखाच उपदव्याप म्हणा ना! उमेशने २०१९मध्ये शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याला अंतिम ११मध्येही संधी देण्यात आली. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीपक चहरवर यामुळे डगआऊटमध्ये बसण्याची वेळ आली. दीपक चहरचा विश्वचषकासाठीच्या संघात राखीव खेळाडूंमध्ये समावेश आहे, हे विशेष. कहर म्हणजे, उमेश यादव विश्वचषकाच्या मुख्य संघातही नाही आणि राखीव खेळाडूही नाही. तरीही अंतिम ११मध्ये बसला. चहरसारखे असे बळीचे बकरे करून विश्वचषकाचा सण साजरा होणार आहे का? रविचंद्रन अश्विनही असाच मध्येच उगवला. २०२१च्या टी-२० विश्वचषकात अश्विन संघाचा भाग होता, तरी त्यानंतर आठ महिने तो क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमधून बाहेर होता. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी तो भारतासाठी शेवटचा टी-२० सामना खेळला होता. अचानक २९ जुलै २०२२ रोजी तो वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत अवतरला. त्यानंतर त्याला आशिया चषक स्पर्धा खेळायची संधीही मिळाली. आता तो टी-२०च्या विश्वचषक संघातही आहे. तब्बल आठ महिने पडून असलेली भांडी घासल्यावर लख्खपणे चकाकावित, तसे अश्विनचे तेज मैदानात रविचंद्राप्रमाणे तेजाळले, तरच टीम इंडियाचे नशीब उजळेल अन‌् फळफळेल. म्हणूनच ‘जमके रखना कदम ओ मेरे साथिया...’ असेच म्हणावेसे वाटते. भुवनेश्वर कुमारला खरे तर आधार देण्याची गरज आहे.

वारंवार त्याच्याकडून चुका होत आहेत; पण तो एक उपयुक्त गोलंदाज आहे. आशिया चषक २०२२मधील सुपर फोरच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भुवनेश्वरने १९ व्या षट्कात १९ धावा दिल्या होत्या. श्रीलंकेविरुद्धच्या पुढच्याच सामन्यात त्याने निर्णायक षट्कात १४ धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वरने सतराव्या आणि एकोणिसाव्या डेथ ओव्हरमध्ये अनुक्रमे १४ आणि १६ धावा दिल्या. भुवनेश्वरचा या वर्षात १३ डावांतील डेथ ओव्हर्समध्ये इकॉनॉमी रेट १०.७३ इतका आहे. ही आकडेवारी निराशाजनक असली, तरी कोणत्याही वेळी मुसंडी मारण्याची क्षमता भुवनेश्वरमध्ये नक्कीच आहे. एखाद्या खेळाडूचा खुबीने वापर करून घेणे हेच तर खरे कौशल्य असते. आशिया कप स्पर्धेत दीपक हुडा संघात असूनही त्याला गोलंदाजी मिळू शकली नाही, हेदेखील अनेकांना खटकले. तेव्हा ‘काखेत कळसा अन‌् गावाला वळसा’ ही प्रवृत्ती टाळली पाहिजे. आता झाले ते झाले. ‘देखेंगे देखा हैं, जादू क्या ऐसा हैं, यारो से जलने का काटो पे चलने का, काटो पे चलने का क्या हैं फायदा?’ असे संघ व्यवस्थापनाला वाटले पाहिजे. सदैव प्रयोग करण्याऐवजी ‘देर आये दुरुस्त आये’ या भावनेतून सुयोग्य नियोजन, कठोर परिश्रम, धाडसी धोरण, व्यूहरचनेतील कल्पकता आणि सांघिक समरसता यांचा तर्कशुद्ध ‘लॉन्ग व्हिजन’ने ताळमेळ साधायला हवा. असे झाले तर ‘आ देखे जरा, किस में कितना हैं दम.. ’ असे आव्हान प्रतिस्पर्ध्यांना देण्याइतपत प्रभावशाली बळ खेळाडूंमध्ये निर्माण होईल. मैदानावर बाजी मारून टी-२० विश्वचषक मोठ्या ऐटीत ऑस्ट्रेलियातून भारतात आणता येईल, निश्चितच.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in