नवी दिल्ली : उरुग्वेचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लुइस सुआरेझने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती घेण्याची घोषणा मंगळवारी केली.
३७ वर्षीय सुआरेझ गेली १७ वर्षे उरुग्वे संघाचा अविभाज्य घटक होता. शुक्रवारी पराग्वेविरुद्ध विश्वचषक पात्रता फेरीतील सामना सुआरेझच्या कारकीर्दीतील अखेरचा असेल. २०२६च्या फिफा विश्वचषकापर्यंत तंदुरुस्ती टिकवणे कठीण असल्याचे सांगत सुआरेझने निवृत्ती पत्करली. मात्र तो क्लब पातळीवर खेळत राहणार आहे. सुआरेझने उरुग्वेसाठी १४२ सामन्यांत ६९ गोल केले. त्याने ४ विश्वचषक व ५ कोपा अमेरिका स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व केले. २०११च्या कोपा अमेरिका विजेत्या उरुग्वे संघाचा सुआरेझ भाग होता.