
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जात असलेल्या वनडे क्रिकेट मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. असं असलं तरी भारताचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहलीने त्याच्या ५६ धावांच्या खेळीने एक विशेष टप्पा गाठला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकदिवसीय फॉर्मेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक वेळा धावा करणारा विराट कोहली आता टॉप-3 फलंदाजांच्या यादीत पोहोचला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या राजकोट वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मधील प्रमुख खेळाडूंचं पुनरागमन झालं. यामध्ये विराट कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचाही समावेश आहे. या सामन्यात विराटने ६१ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीच्या जोरावर कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे.
रिकी पॉन्टिंगने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ११२ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता. आता विराट कोहलीने हा पराक्रम११३ वेळा केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपडू सचिन तेंडुलकरचे या यादीत पहिले स्थान आहे, सचिनने आपल्या कारकिर्दीत १४५ वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा आहे. संगकाराने ११८ वेळा ही कामगिरी केली आहे.