वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर विजय, मालिकेत १-०ने आघाडी

रोचने बांगलादेशच्या पहिल्या डावातही २१ धावांत दोन बळी टिपले होते
वेस्ट इंडिजचा बांगलादेशवर विजय, मालिकेत १-०ने आघाडी

अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशवर सात गडी राखून विजय मिळविला. मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विजयासाठीचे ८४ धावांचे माफक लक्ष्य यजमानांनी २२ षटकांत तीन गडी बाद ८८ धावा करीत साध्य केले. जर्मेन ब्लॅकवूड (५३ चेंडूंत नाबाद २६) आणि सलामीवीर जॉन कॅम्पबे (६७ चेंडूंत नाबाद ५८) यांनी वेस्ट इंडिजचा विजय साकार केला. प्रभावी गोलंदाजी करत ५३ धावांत पाच विकेट्स घेणाऱ्या केमर रोचला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. रोचने बांगलादेशच्या पहिल्या डावातही २१ धावांत दोन बळी टिपले होते.

केमर रोच (५३ धावांत पाच बळी) आणि अल्झारी जोसेफ (५५ धावांत तीन बळी) यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे बांगलादेशचा दुसरा डाव २४५ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे विंडीजला विजयासाठी ८४ धावांचे लक्ष्य मिळाले.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ बाद ४९ धावा केल्या होत्या. जर्मेन ब्लॅकवूड (१७) सलामीवीर जॉन कॅम्पबेलसह (२८) नाबाद होते. वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ ३५ धावांची आवश्यकता होती.

पहिल्या चार षटकांत वेस्ट इंडिजने अवघ्या ९ धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी बांगलादेशी गोलंदाज चमत्कार करू शकतील, अशी शक्यता दिसत होती. पण त्यानंतर कॅम्पबेल आणि ब्लॅकवुड यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट पडू दिली नाही. बांगलादेशकडून खालिद अहमदने या तीन विकेट घेतल्या. बांगलादेशने तिसऱ्या दिवशी २ बाद ५० धावांवरून खेळाला पुढे सुरुवात केली. पण मोठी धावसंख्या करून सामन्यात पुनरागमन करण्याची संधी बांगलादेशने गमावली. बांगलादेशच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावात १०३ धावांवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावातही बांगलादेशला केवळ २४५ धावाच करता आल्या. केवळ कर्णधार शकिब अल हसन (९९ चेंडूंत ६३) आणि यष्टिरक्षक नुरुल हसन (१४७ चेंडूंत ६४) यांनी दमदार अर्धशतके झळकविली. बांगलादेशने एकवेळ १०९ धावांवर सहा विकेट्स गमावल्या होत्या. मात्र या दोन खेळाडूंच्या शतकी भागीदारीमुळे डाव सावरला गेला. सलामीवीर तमिम इक्बाल २२ आणि महमुदुल हसन ४२ धावांवर बाद झाले.

केमार रोच आणि अल्झारी जोसेफ यजमानांसाठी प्रभावी गोलंदाज ठरले. रोचच्या पाच विकेट्समध्ये कर्णधार शकीबसह नुरुलच्या विकेटचा समावेश होता. याशिवाय अल्झारी जोसेफला तीन आणि मेयर्सला दोन बळी मिळाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in