दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागा अजिंक्य; अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास

दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागा अजिंक्य; अजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास

पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. दक्षिण विभागाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या.

अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभागाने दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण विभागाचा २९४ धावांनी पराभव करून अजिंक्यपद पटकाविले. दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभागाचे हे एकोणिसावे विजेतेपद ठरले.

पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. दक्षिण विभागाने पहिल्या डावात ३२७ धावा केल्या. पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात ४ बाद ५८५ अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे दक्षिण विभागाला सामना जिंकण्यासाठी ५२९ धावांचे जटील आव्हान मिळाले होते; परंतु त्यांना अवघ्या २३४ धावाच करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर रोहन कुनुमल (१०० चेंडूंत ९३) आणि रवी तेजा (९७ चेंडूंत ५३) यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज विकेटवर टिकू शकला नाही. संपूर्ण संघ ७१.२ षट्कांत अवघ्या २३४ धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात शम्स मुलानीने चार आणि जयदेव उनाडकटने दोन विकेट‌्स मिळविल्या. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात पश्चिम विभागाने सावध सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि प्रियांक पांचाल यांनी ११० धावांची सलामी दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणे (३५ चेंडूंत १५), श्रेयस अय्यर (११३ चेंडूंत ७१) आणि सर्फराज खान (१७८ चेंडूंत १२७) चार षट्कार आणि तब्बल ३० चौकार लगावले. यांनी यशस्वीला चांगली साथ दिली. यशस्वीने २६५ धावा करताना चार षट्कार आणि तब्बल ३० चौकार लगावले.

चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वाल (३२४ चेंडूंत २६५), सर्फराज खान (१७८ चेंडूंत १२७) आणि हेत पटेल (६१ चेंडूंत नाबाद ५१) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पश्चिम विभागाने दुसरा डाव चार बाद ५८५ धावांवर घोषित केला. त्यामुळे दक्षिण विभागाला विजयासाठी ५२९ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत दक्षिण विभागाच्या ६ गडी गमावून १५४ धावा झाल्या होत्या. पाचव्या दिवशी रविवारी दक्षिण विभागाला धावसंख्येत केवळ ८० धावांची भर घालता आली.

देशांतर्गत दुलीप करंडक स्पर्धेत पश्चिम विभाग चॅम्पियन ठरला. या पाच दिवसीय सामन्यातील पहिल्या दोन दिवसांत पश्चिम विभाग पिछाडीवर होता; मात्र शेवटच्या तीन दिवसांत पश्चिम विभागाने जोरदार दमदार मुसंडी मारत करंडकावर नाव कोरले. ३२४ चेंडूंत २६५ धावा फटकविणाऱ्या यशस्वी जैस्वालला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.

स्लेजिंगमुळे सामन्याला गालबोट

अंतिम सामन्याचा शेवटचा दिवस वादग्रस्त ठरला. स्लेजिंगमुळे सामन्याला गालबोट लागले. कर्णधार अजिंक्य रहाणेवर आपल्या संघातील गुणवान खेळाडू यशस्वी जैस्वालला चक्क मैदानाबाहेर काढण्याची वेळ आली. यशस्वी वारंवार दक्षिण विभागाच्या फलंदाजांची विशेषतः रवी तेजाची स्लेजिंग करत होता. पंचांनी यशस्वीला दोन-तीन वेळा इशाराही दिला; मात्र डावाच्या ५७ व्या षट्कात यशस्वीने पुन्हा स्लेजिंग केले. तेव्हा यशस्वीला मैदान सोडावे लागले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in