ठाणे : दोनच दिवसांपूर्वी ठाणे महानगर पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी ५ रुग्ण दगावल्याचा प्रकार उघडकीस आता असताना रविवारी केवळ १२ तासांत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे या रुग्णालयाच्या औषधोपचार पद्धतीवर आणि डॉक्टरांच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कळवा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबाबत जनतेत नाराजी असताना रुग्ण दगावत असल्याने रुग्णालयाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी यंत्रणा आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकाच रात्रीत १७ जणांना जीव गमवावा लागला असल्याचे सांगितले जात आहे. यातील १३ रुग्ण हे आयसीयू मधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते. या रुग्णांना शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल केल्याची सारवासारव रुग्णालय प्रशासन करीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा देताना काही रुग्ण खासगी दवाखान्यातून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण ८० पेक्षा जास्त वयाचे असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे सिव्हील रुग्णालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने सध्या ते दुसरीकडे शिफ्ट झाले आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. १० तारखेला एकच दिवशी ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. असे असताना शनिवारी रात्री १०.३० पासून रविवारी सकाळी ८.३० पर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळत चालली असल्याचा आरोप विरोधी पक्ष करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर छ. शिवाजी महाराज रुग्णालयाची क्षमता देखील १००० बेड ची करण्याचे ठरले आहे. मात्र, हे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, कळवा रुग्णालयाच्या डीन यांनी याबाबत जिल्हा रुग्णालयाचे झालेले शिफ्टींगमुळे जिल्हाभरातून येणारे रुग्ण आता कळवा रुग्णालयात येत आहेत. आधीच या 500 बेड्स असलेल्या रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असताना आता या वाढीव गर्दीमुळे हे हॉस्पिटल खूपच अपुरे पडत आहे. त्यामुळे उपलब्ध डॉक्टर्स, नर्सेस आणि एकूणच कर्मचारी वर्ग देखील कमी पडत आहे. त्यामुळे दुर्दैवाने अशा घटना वाढत असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे.
५०० बेडच्या रुग्णालयात ६०० रुग्ण
“प्रत्येकाच्या मृत्यूची कारणे वेगळी आहेत. त्यांना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण त्यांना वाचवू शकलो नाही. आम्ही ५०० बेडच्या रुग्णालयात जवळजवळ ६०० रुग्ण अॅडमिट केले आहेत. येथील डॉक्टर्स २४-२४ तास काम करत आहेत. आम्ही शक्यतो कोणत्याही रुग्णाला परत पाठवत नाही. इकडे येणारा प्रत्येक माणूस गरीब किंवा आदिवासी असतो. ते अनेकदा अत्यावश्यक स्थितीत येतात. ते कसल्याही स्थितीत आले तरी आम्ही त्यांच्यावर उपचार करतो,’’ राकेश बारोट, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय