काँग्रेसला संजीवनी देण्याची नव्याने कसरत सुरु;संघठन वाढवण्याचे प्रयत्न सुरु

२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे कॉंग्रेसचे अध्यक्ष पद जवळपास दीड वर्षे रिक्त होते
 काँग्रेसला संजीवनी देण्याची नव्याने कसरत सुरु;संघठन वाढवण्याचे प्रयत्न सुरु

ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट आहे. जिल्ह्यात एकही खासदार अथवा आमदार निवडून आलेला नाही. भिवंडी महानगरपालिका वगळता एकाही महापालिका, नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता नाही, ठाणे महापालिकेत अवघे तीन नगरसेवक निवडून आलेले आहेत. दरम्यान, पालिका निवडणुकांचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी घोषित होणार असताना गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला संजीवनी देण्याची कसरत नव्याने सुरु करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात महागाई, बेरोजगारी, जनसामान्यांचे विविध प्रश्न या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येत असून संघठन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीपूर्वी ठाणे कॉंग्रेसचे अध्यक्ष पद जवळपास दीड वर्षे रिक्त होते. बरीच गटबाजी असल्याने अध्यक्ष जाहीर न करता सहा जणांची कार्यकारी समिती नेमण्यात आली होती. जवळपास दीड वर्षे अध्यक्षा शिवाय कॉंग्रेसचा कारभार सुरु होता. मात्र, महापालिका निवडणुका येताच प्रदेश कमिटीवर असलेले जेष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे अवघे ३ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी वर्तकनगर परिसरातील काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अडीच वर्षे राज्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असतानाही ठाणे जिल्ह्यात मात्र काँग्रेस कुठेच दिसत नव्हती. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नगरविकास मंत्रिपद होते. तर, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गृहनिर्माण मंत्रिपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यात काँग्रेस मात्र कोरी होती.

दोन वर्षांपासून जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद वाढवण्याची जबाबदारी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारताच मुंब्रा या हक्काच्या गडावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी राष्ट्रवादीत गेलेल्या नईम खान यांना पुन्हा काँग्रेस मध्ये आणून राष्ट्रवादीला पहिला झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यात विविध आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने आपले अस्तित्व दाखवायला सुरवात केली असून जिल्हा सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन शिंदे तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून जनसामान्यांचे विविध प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in