

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेची सत्ता मिळविण्यासाठी शिवसेना भाजपात सुरू असलेल्या धोबीपछाड खेळीत अखेर शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपने बहुमताचा आकडा गाठलाही होता. पण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रातोरात खेळी करून भाजपाशी आघाडी असलेल्या राष्ट्रवादीला गळाला लावले. आणि चक्रे उलटी फिरवून भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेचा अंबरनाथचा गड राखला. तर काँग्रेसच्या १२ निलंबित नगरसेवकांना सोबत घेऊनही बहुमत सिद्ध करू न शकलेल्या भाजपसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युतीच्या बिघाडीवरून आठवडाभर राज्य पातळीवर राजकारण तापले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी पुन्हा शिवसेना भाजप युतीची दोन्ही नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही रविवारी भाजपने पत्रकार परिषद घेत युतीचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला. त्यामुळे सोमवारी पालिका सभागृहात होणाऱ्या पहिल्या सभेत कोण बहुमत सिद्ध करतो याकडे लक्ष लागले होते. त्यानुसार भाजप आणि शिवसेनेचे अज्ञातस्थळी असलेले सर्व ७८ नगरसेवक दुपारी पालिकेत दाखल झाले. त्यानंतर पालिका इमारतीच्या आवारात भाजप समर्थकांकडून उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार सदाशिव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरणातच सभागृहातही उपनगराध्यक्ष पदाची निवड सुरू झाली होती. तर राष्ट्रवादीच्या गटाच्या पाठिंब्यावरून भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये व्हीपवरून अनेक तांत्रिक मुद्द्यांवरून खडाजंगी उडाली. अखेर तासाभराच्या चर्चेनंतर आणि ३२ नगरसेवकांच्या बहुमताच्या जोरावर शिवसेनेचे सदाशिव पाटील यांची उपनगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे शिवसेना, भाजपमधील चेकमेटच्या खेळात अखेर बहुमताच्या जोरावर शिवसेनेने उपनगर अध्यक्ष पदासह तीन स्वीकृत नगरसेवक तसेच सर्व विषय समित्यांसह अंबरनाथ नगरपालिकेवर आणि आपल्या बालेकिल्ल्यावर सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. तर अंबरनाथ पालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष असतांनाही आम्ही युतीसाठी सकारात्मक आणि प्रयत्नशील होतो. मात्र काँग्रेसमधून आलेल्या नगरसेवकांनी भाजपला वेठीस धरल्याने भाजपला हा फटका बसला. मात्र आज पूर्ण बहुमताने अंबरनाथ पालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन झाली असून भाजपसाठी यापूढेही आमचे दरवाजे मात्र खुले आहेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.
या अंबरनाथ नगर परिषदेत भाजपने काँग्रेसशी युती केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.
राजकीय चातुर्याने सत्ता मिळवली
नगराध्यक्ष पद गमावल्यानंतरही शिवसेनेने राजकीय चातुर्य आणि बहुमताच्या जोरावर उपनगराध्यक्ष पद आणि सत्ता काबीज केल्यानंतर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या दालनात जाऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवसेनेकडून सुभाष साळुंके, रोहित महाडिक तर भाजपकडून विश्वजीत करंजुले-पाटील, उमेश पाटील यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या जागेबाबत दोन्ही गटाकडून संख्याबळानुसार दावा केला जात आहे. यावरून सभागृहात मोठा गदारोळ सुरू असताना मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे सांगितले. शिवसेनेकडून देखील जिल्हाधिकारी यांना त्यासंदर्भात पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.