डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरू

डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरू

डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी मोठ्या प्रमाणात सुरू असून दररोज नियमांचे पालन न करणे, जवळचे भाडे नाकारणे,प्रवाश्यांना उद्धट उत्तरे देणे अशाप्रकारे बेशिस्त वागण्याची रिक्षाचालकांनी शपथच घेतल्याचे चित्र सगळीकडे पहावयास मिळत आहे. उपप्रादेशिक परिवहन कल्याण विभागाने डोंबिवली शहराला पाठ दाखवल्याने संपुर्ण वाहतूकीचे बारा वाजले आहे. नियमानुसार रिक्षात तीन प्रवासी वाहतूकीस परवानगी असताना देखिल रिक्षाचालक वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोरून राजरोजसपणे चार सीट बसविल्या जातात. आता तर चक्क रिक्षात पाच प्रवासी बसवून वाहतुक सुरू झाली आहे. आहे. यावर मात्र रिक्षा युनियन शांत बसले असून एकप्रकारे रिक्षाचालकांनी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसते.

डोंबिवली जवळील इंदिरा चौकात विविध राजकीय पक्षांच्या रिक्षा संघटनेच्या रिक्षा उभ्या असतात.तर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयासमोरील रिक्षा स्टॅंडवरही चार सीट पूर्ण झाल्याशिवाय रिक्षाच सुरु होत नाहीत.मंगळवारी दुपारच्या सुमारास याच रस्त्यावर एका रिक्षात चक्क पाच प्रवासी बसविले होते.या रिक्षाचालकांचा प्रताप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजेंद्र नांदोस्कर यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सामाजिक माध्यमात हे दृश्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डोंबिवलीतील अनेक भागातील रिक्षात राजरोजसपणे नियमांना बगल देत चार प्रवासी वाहतूक सुरू असतांना मात्र वाहतूक पोलीस दुचाकींवरील वाहनचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत.

डोंबिवली पूर्वेकडील रामनगर रिक्षा स्टॅंड हा वाहतूक नियंत्रण उपशाखेसमोर असूनही रिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. दुर्दैवाने अशी वाहतूक होत असतांना अपघात झाल्यास या परिस्थितीला मुजोर रिक्षाचालक की आपला जीव धोक्यात असल्याचे माहिती असून पाचव्या सीटवर बसून प्रवास करणारा प्रवासी यापैकी जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वाहतूक पोलिसांनी तात्काळ पाच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीकरांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in