भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता;एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पाडले खोटे

राज्याच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला एकनाथ शिंदेंच्या रूपात मुख्यमंत्रिपदाचा बहुमान मिळाला आहे.
भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता;एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पाडले खोटे

“तुमच्याकडे आमच्यापेक्षा अर्धे आमदार असतानाही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. बिहारमध्ये नितीशकुमार यांचे आमच्यापेक्षा कमी आमदार निवडून आले तरी आम्ही त्यांना मुख्यमंत्रिपद दिले, असे असेल तर आम्ही शिवसेनेला शब्द दिला असता, तर मुख्यमंत्रिपद दिले नसते का? असा सवाल मलाच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी विचारला,” असे स्पष्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे पडले आहे. अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्या दाव्यावरच शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्याच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला एकनाथ शिंदेंच्या रूपात मुख्यमंत्रिपदाचा बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या जनगौरव सोहळ्यात त्यांच्या सत्काराबरोबरच रात्री उशिरा त्यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. रात्री १२.३०पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता तरी नाट्यगृह खचाखच भरलेले होते. ‘‘शिवसेना-भाजपने युती करून २०१९ साली निवडणूक लढवली. जनतेने भरभरून मतदान दिले. दोन्ही पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले. शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होईल, असे वाटत होते; पण तसे झाले नाही. पक्षनेतृत्वाने जो निर्णय घेतला, तो मान्य नसतानाही बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ सैनिक असल्याने आम्ही तो मान्य केला आणि सरकारमध्ये सामील झालो; मात्र मुख्यमंत्री आमचा असतानाही

सैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले. कार्यकर्ते तडीपार होत होते. सत्ता असताना कार्यकर्त्यांना त्रास झाला; आम्ही अनेक वेळा समजून सांगितले; पण दुर्दैवाने यश मिळाले नाही,’’ असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘‘काँग्रेस, राष्ट्रवादी आपले राजकीय शत्रू आहेत, असे बाळासाहेब सतत सांगायचे. मग आमचे कुठे चुकले, राष्ट्रवादीचे नेते जाहीरपणे बोलत होते. पुढचा मुख्यमंत्री आमचाच, आमच्या आमदारांच्या मतदारसंघात पडलेल्या उमेदवारांना निधी देण्यात येत होता, त्यामुळे आमच्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती आणि त्या सर्वांनी मला पुढाकार घ्यायला लावला,’’ असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे काम सुरू असल्याचे आरोप सतत होत असतात, असा प्रश्न विचारला असता, ‘‘मुंबई आपली राजधानी आहे, मान, वैभव, शान आहे. अशा उलटसुलट चर्चा, गैरसमज, राजकीय फायदा घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, असा आरोप विरोधकांवर करताना सरकारचे नाव वर्षानुवर्षे लोक काढतील, असे काम करून दाखवू,’’ असा दावाही शिंदे यांनी केला. ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील सुमारे १९२ संस्थांच्या पुढाकाराने शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांचा हा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश गुरुमाउली अण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेही अतिथी म्हणून उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in