दिवा शहरातील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी पुरवठा

दिवा शहरातील नागरिकांना मिळणार मुबलक पाणी पुरवठा

ठाणे शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळते, त्याचपद्धतीने दिवा शहरातील नागरिकांना किमान पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दिवा महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केलेल्या आंदाेलनाला अखेर यश मिळाले आहे. त्यांनी २० एप्रिल रोजी असंख्य महिलांसाेबत पाणी हक्क मोर्चा काढला होता. त्यावेळी ज्या परिसरात पाणी मिळत नाही तिकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार दिव्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

दिव्याचा पाणीप्रश्न सुटेल असे दर पाच वर्षांनी येथील सत्ताधारी सांगत होते, मात्र प्रत्यक्षात दिवा शहरातील नागरिकांना गरजेपुरते सुद्धा पाणी मिळत नसल्याचे वास्तव समाेर आले आहे. अनेक भागांत दोन ते तीन दिवसांनी चार-पाच हंडे पाणी मिळते. लोकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते, येथील नागरिक हे सामान्य कुटुंबातील आहेत. अनेकांची आर्थिक स्थिती बेताची आहे, अशा स्थितीत महिन्याला टँकरसाठी लोकांनी २ ते ३ हजार रुपये कुठून आणायचे? जी लोक टँकरने पाणी विकत घेऊ शकतात ती लोक पालिकेचे बिल भरू शकणार नाहीत का? येथील जनतेला पाणी द्यायचे नाही हाच सत्ताधारी लोकांचा उद्देश दिसतो. या गंभीर पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी आणि दिव्याच्या नागरिकांना ठाण्यातील नागरिकांप्रमाणे मुबलक पाणी दररोज मिळावे या मागणीसाठी दिव्यातील महिलांनी ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली २० एप्रिल मोर्चा काढला होता .

या मोर्चात अामदार संजय केळकर, आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले होते त्यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जोपर्यंत दिव्याला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत दिवावासीयांना महापालिकेतर्फे मोफत टँकर सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते.

याचा पाठपुरावा ज्योती पाटील आणि भारतीय जनता पार्टी विभागाकडून करण्यात आला असून दिवावासीयांना ज्या ज्या विभागांत पाणी नाही, त्या त्या विभागांत भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाने महापालिकेतर्फे मोफत टँकर पुरवण्यास सुरवात झाली आहे. यासंदर्भात ज्योती पाटील यांना विचारले असता आम्ही सदैव दिव्यातील जनतेसोबत असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप कायम संघर्ष करत रहाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in