ठाणे विधानसभेवर काँग्रेसचा दावा;उमेदवारीसाठी इच्छुकांचे वरिष्ठांकडे अर्ज, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष!

ठाणे विधानसभेवरून एकीकडे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत दावे-प्रतिदावे होत असताना आता या विधानसभा क्षेत्रावरून महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडला आहे.
ठाणे विधानसभेवर काँग्रेसचा दावा;उमेदवारीसाठी इच्छुकांचे वरिष्ठांकडे अर्ज, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष!
Published on

ठाणे : ठाणे विधानसभेवरून एकीकडे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत दावे-प्रतिदावे होत असताना आता या विधानसभा क्षेत्रावरून महाविकास आघाडीतही मिठाचा खडा पडला आहे. ठाणे विधानसभेवर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसलाच मिळावी, असा आग्रह ठाण्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी धरला आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश जाधव यांनी ठाणे विधानसभेसाठी इच्छुक म्हणून वरिष्ठांकडे अर्ज दाखल केला असल्याने ठाकरे गट यावर काय भूमिका घेणार याकडे, आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीकडून दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत. ठाण्यातील चार जागांवरून महायुतीमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याने ही जागा वगळता अन्य तीन विधानसभा क्षेत्रासाठी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे. विशेष करून ठाणे विधानसभेसाठी शिवसेनेकडून एकीकडे दावा करण्यात येत असून दुसरीकडे सध्या आमदार संजय केळकर हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार असल्याने भाजप हा मतदारसंघ सोडायला तयार नाही.

महायुतीमधील हा संघर्ष आता महाविकास आघाडीतही सुरू झाला असून ठाणे विधानसभेबरोबरच अन्य तीन मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे ठाणे विधानसभेसाठी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश जाधव यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे. आपण इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसचा कोणीही उमेदवार या ठिकाणी उभा राहू शकतो मात्र या जागेवर काँग्रेसचा दावा असेल असे राजेश जाधव यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे विधानसभेसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांच्या विरोधात पराभूत झालेले माजी खासदार राजन विचारे हे देखील इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे उबाठा पक्षाचा यापूर्वीच ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी दावा असल्याने या जागेवरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये संघर्ष अधिक वाढण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ

ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी कळवा, मुंब्रा वगळता तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत, हे तीन काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ आहेत. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. २०१९ ला काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला दिली आणि राष्ट्रवादीने परस्पर ही जागा मनसेला दिली असल्याचा दावा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in