
ठाणे परिसरात बहुतांशी डोंगर परिसरात झोपड्यांमध्ये जे नागरिक रहातात त्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यातील रोजची रात्र जीव मुठीत धरून काढावी लागते. आता पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला तरी काही उपाययोजना करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे क्लस्टर योजनेची दिरंगाई चालू असल्याने येणाऱ्या पावसाळ्यातही मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे आणि अनधिकृत झोपड्या वसवण्यात आल्या असल्याने शहराच्या नियोजनावर मोठा परिणाम झाला आहे. ठाणे महापालिका तसेच इतर जबाबदार सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्यानेच ही परिस्थिती ओढवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षी या भागातील डोंगर उतारावरील झोपड्यांवर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता या भागातील रहिवाश्ाांना सावधानतेचा इशारा पालिकेतर्फे देण्यात येतो. तशाच प्रकारचा इशारा एमआयडीसीकडूनही देण्यात येतो. अशा जाहीर सूचना दिल्या जात असल्या तरी अशा धोकादायक जागेतील रहिवाश्ाांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत असे इशारे कागदावरच राहणार, असे दिसत आहे.
वारलीपाडा, रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर येथील काही झोपड्या डोंगरावर आणि डोंगरउतारावर आहेत. यापैकी रामनगर, हनुमाननगर, इंदिरानगर येथील जागा एमआयडीसीची आहे. डोंगराचा भाग हा पावसाच्या पाण्यामुळे कमकुवत झाला असल्याने दरड कोसळून दुर्घटना होऊ शकते. २००५ सालच्या माहिती नुसार ठाणे महापालिका हद्दीत वन विभागाच्या जमिनीवर अवघी १३ हजार ८२४ बेकायदा बांधकामे होती, ती आता गेल्या १७ वर्षांत वाढून लाखोंच्या घरात गेली असण्याची शक्यता आहे. कळवा, विटावा, खारेगाव, पारसिकनगर, कळवा पूर्वेला न्यू शिवाजी नगर, आनंद नगर, गणपत पाडा, मफतलाल झोपडपट्टी, आतकोनेश्वर नगर, पौंडपाडा, घोलाईपाडा, वाघोबा नगर, मुंब्रा, कौसा, पारसिक डोंगर, वागळे मामाभाचा डोंगर, घोडबंदर या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असून त्यांच्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर ठाेस पावले उचलण्याची गरज आहे.