
गेली दोन वर्षे राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची ठाण्यातील वादावादी सर्वश्रुत आहे. मात्र निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी विस्कटलेली आघाडीची गाठ बांधण्यात येणार असल्याचे वेळोवेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने एकत्र यायला तयार होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे शेजारच्या नवी मुबंईत गणेश नाईक यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आघाडी करण्यावर शिक्कमोर्तब केले आहे. ठाण्यात मात्र अद्याप आघाडीची एकही बैठक झालेली नसल्याने ठाण्यात आघाडी होणार की बिघाडी यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
ओबीसी आरक्षणाचा निर्णय प्रलंबित असल्याने महापालिका निवडणुका अजून काही महिने पुढे जातील, अशी शक्यता होती. मात्र निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याने मुंबईसह ठाणे महापालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून राष्ट्रवादीला कळवा-मुंब्रा परिसरात घेरण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत दिवा परिसरात दोन नगरसेवक वाढलेले असताना मुंब्र्यातील नगरसेवक मात्र कमी झाले असल्याने राष्ट्रवादीत काहीशी नाराजी असल्याचे चित्र आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडीचे बळ वाढावे, यासाठी महापालिकांमध्ये तीन वार्डांचा प्रभाग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ठाणे महापालीकेत या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सत्ताधारी शिवसेनेला होणार आणि त्यांची सत्ता अबाधित राहणार; तर कळवा, मुंब्रा परिसरात पुन्हा एकदा राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे दिवा, कळवा, खारेगाव आणि विटावा परिसरात आपलेही बळ वाढावे यासाठी शिवसेनेने नियोजन सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे, विशेष म्हणजे काही वर्षांचा अपवाद वगळता कळवा, मुंब्रा परिसरात राष्ट्रवादीचे बळ चांगलेच वाढले आहे. त्यांचे जे ३४ नगरसेवक निवडून आले आहेत त्यातील २६ हे कळवा, मुंब्य्रातून निवडून आले आहेत.