
केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनाही जे जमली नाही ते शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट पाडण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे. मात्र एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटतील आणि दुसरे नारायण राणे होतील असे माजी आमदार आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी आठ वर्षांपूर्वीच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना उघडपणे सांगितले होते. अनंत तरे हे आज हयात नाहीत गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांचे निधन झाले. ठाण्याच्या राजकारणात तरे आणि शिंदे यांच्यात शेवटपर्यंत राजकीय संघर्ष सुरु होता मात्र सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अनंत तरे यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेनेवर पकड घेताच तरे यांना डावलून एकनाथ शिंदे याना बळ दिले होते.
अंनत तरे हे शिवसेनेचे उपनेते होते आनंद दिघे शिवसेना जिल्हा प्रमुख असताना ठाणे महापालिकेचे लागोपाठ तीनवेळा विक्रमी महापौरपद त्यांनी भूषवले होते. त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या अगदी ते जवळ होते. १९९६ साली रायगड लोकसभा मतदार संघातून ए. आर. अंतुले यांच्या विरोधात त्यांनी कडवी लढत दिली होती. थोड्या मतांनी पराभूत झालेल्या तरे यांनी २००० ते २००६ या काळात त्यांनी कोकण विधान परिषदेवर प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यानंतर त्यांना फारसे महत्वाचे पद मिळालेले नाही. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेने त्यांना विचारणा केली होती मात्र आपल्याला विधानसभा हवी असल्याचे सांगत त्यांनी नकार दिला असल्याची चर्चा होती. दरम्यान २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी उत्सुक असताना त्यांना डावलत कॉंग्रेसमधून आलेल्या रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने तरे चांगलेच संतप्त झाले होते आणि बंडाचा बिगुल वाजवत त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोपरी पाचपाखाडी मतदार संघातून उमेदवारी दाखल केली होती. भाजपने त्यांना एबी फॉर्म देण्याच्या हालचाली सुरु केल्याने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्री वर बोलावून त्यांची समजूत काढली होती आणि त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या कारकिर्दीत पालघरची विधानसभा पोटनिवडणूक शिवसेनेने जिंकली असल्याने त्यांचे पारडे जड झाले होते. त्यामुळे विधान परिषदेवर त्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा सुरु असतानाच एकविरा गडावर दोन गटात हाणामारी झाली आणि त्याचे पडसाद ठाण्यात उमटले तरे यांचा पुतळा जाळण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती मात्र यामागे आपल्याला बदनाम करण्याचे राजकारण असून कोण कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवत आहे, हे सगळ्यांना माहित आहे असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी लगावला होता.