खड्डेपुराण आवडे सर्वांना

यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी लागली
खड्डेपुराण आवडे सर्वांना

पावसाळा आला की रस्त्यांची चाळण होते, लहान मोठे खड्डे पडून रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण होते. हा गेल्या दशकातील शिरस्ता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरात आजही कायम आहे. ठाणे शहराकडे येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या बहुतांशी रस्ते आणि पुलांवर मोठंमोठे खड्डे पडल्याने जवळपास दोन आठवडे लागोपाठ ठाणे शहराची कोंडी झाली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले. महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा शर्मा यांना रस्त्यावर उतरावे लागले. इतर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी लागली, आणि अवजड वाहनांच्या वेळा बदलाव्या लागल्या. दोन आठवड्याच्या अथक परिश्रमानंतर परिस्थिती काहीशी बदलली आहे. मात्र काँक्रीटचे रस्ते वादात असताना दरवर्षी खड्डे वाढत आहेत. आणि ते बुजवण्यासाठीचा खर्च वाढत चालला आहे. यातही काही आर्थिक गणित दडले आहे का ? याचेही उत्तर शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या अगदी लगत असलेल्या ठाणे शहर आणि आणि परिसरात बहुतांशी लहान मोठ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कळव्याचा जुना पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला,त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

दरम्यान शहरातील बहुतांशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहनांच्या रंगाच रांगा लागत आहेत. त्यामुळे एका किलोमीटरच्या प्रवासासाठी अर्धा अर्धा तास लागत होता. अशा प्रकारे ठिकठिकाणी होणार्‍या वाहतूकोंडीमूळे स्थानिक रहिवासी तसेच सर्वसामान्य प्रवासी चांगलेच हैराण झालेले आहेत. मुंबईच्या अगदी लगत असल्याने मोठा भार ठाणे जिल्ह्याला सोसावा लागत आहे. देशभरातून येणारे लोंढे वास्तव्यासाठी या परिसराचा आसरा घेउ लागल्याने नागरीकरण बरेच वाढले. झोपडपट्या वाढल्या तसेच काँक्रीटचे जंगल देखिल वाढू लागले. दुसरीकडे नागरीकरण जस जसे वाढले, तसतसे रस्त्यावर येणाऱ्यांगाड्यांची संख्या प्रचंड वाढत गेली, मात्र जे जुणे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचे पुरेसे विस्तारीकरण किंवा आवश्यक अशा महत्वाच्या रस्त्यांना समांतर रस्ते तयार करण्याचे शहाणपण प्रशासनाला अद्याप तरी सुचलेले दिसत नाही.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठंमोठे खड्डे पडलेले सर्वसामान्य ठाणेकर या वाहतूककोंडीमूळे चांगलाच वैतागला आहे. सकाळी कामावर जाणारा नोकरदार वर्ग आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांना या वाहतूकोंडीचा त्रास मुख्यत्वे सहन करावा लागत आहे. कळवा नाका, जांभळी नाका, टेंभिनाका, स्टेशन रोड, नौपाडा, कापूरबावडी चौक, तलावपाळी, राम मारूती रोड, कपरी या सर्व महत्वाच्या रस्त्यांवर दररोज प्रचंड वाहतूककोंडी झालेली दिसते मोठंमोठ्या खड्ड्यातून त्रास सहन करत ठिकठिकाणी होणार्‍या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्याची कसरत रहिवाशांना करावी लागत आहे.

शहरात महापालिकेचा कारभार असला तरी ज्या प्रमाणात रेखीव शहर वसवले जायला हवे होते. त्या प्रकारे ते वसलेले नाही, किंबहुना तसे शहर वसवण्यासाठी ज्या प्रकारे कठोर निर्णय किंवा जनजागृती व्हायला हवी होती ती झाली नसल्यामुळे शहरात मोठ्या रस्त्यांचे योग्य नियोजन झालेले नाही. याचा मोठा फटका गेल्या काही वर्षात ठाणेकरांना सोसावा लागतो आहे. फक्त टी.चंद्रशेखर यांच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळात बरेचसे कठोर निर्णय झाले. बर्‍याच रस्त्यांवर असलेली अतिक्रमणं बळाचा वापर करून काढण्यात आली आणि रस्ते रूंद करण्यात आले. मात्र सध्या परिस्थिती एवढी बिकट आहे, की हे रस्ते देखील कमी पडायला लागले आहेत. दुसरीकडे यापूर्वीचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यांच्या कार्यकाळातील सुरवातीला शहरातील रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली होती. वर्तकनगर , पोखरण रोड, कळवा नाका, मुंब्रा आणि ठाणे स्टेशन रोड परिसरातील रुंदीकरण करण्यासाठी हजारो बांधकामे तोडण्यात आली. त्यामुळे काही परिसरात वाहतुकीचा मार्ग सुरळीत झाला. मात्र गेल्या चार वर्षांपासून ही मोहीम थंडावली असल्याने शहरातील वाहतूक कोंडीचे चित्र भयावह झाले आहे. पावसाळ्यातच रस्त्यांना खड्डे पडण्याचे आणि त्यांना बुजविण्याचे काम सुरू असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखिल होते.

मुंब्रा बायपासवर खड्ड्यांची चाळण

ठाणे, कळवा, मुंब्रामार्गे डोंबिवलीकडे जाण्यासाठी रेल्वेला समांतर रस्ताच नाही जो रस्ता मंजूर झाला होता तो सरकारने गुंडाळला आहे. सध्या डोंबिवली, कल्याण आणि पनवेलमार्गे पुणे, सातारा कोल्हापूर, बंगलोरकडे जाण्यासाठी ज्या मुंब्रा बायपास रस्त्याचा वापर केला जातो. त्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून गाड्या चालवणे अवघड झाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर सुरू असलेला टोल बंद झाल्यापासून रस्त्याची दुरूस्ती बंद झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. तर खाड्यांमुळे या रस्त्यावर वाहनांच्या मोठ मोठ्या रांगा लागत असल्यामुळे रहिवासी आणि प्रवासी हैराण झाले आहेत.

फक्त कॉंग्रेसने उपस्थित केला सवाल

शहर जवळपास दोन आठवडे खड्ड्यांमुळे कोंडीत सापडलेला असताना राजकीय पातळीवर शांतता होती. एकनाथ शिंदे शिवसेनेतील आमदार घेऊन भाजपसोबत गेले आणि मंत्री झाले. त्यामुळे शिंदे समर्थक आणि भाजप काहीच भूमिका घेत नव्हते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही या कोणी विरोधात आंदोलन केल्याचे ऐकीवात नाही. नाही म्हणायला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी खड्डे बुजवण्यावर जो मोठा खर्च केला जातो त्यावर प्रश्न उपस्थित केला असून खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in