जव्हार तालुक्यात खतांच्या दरात दुप्पट वाढ

जव्हार तालुक्यात खतांच्या दरात दुप्पट वाढ

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात गेल्या दशकापासून ग्रामीण भागांतील शेतीमध्ये आधुनिक बदल करण्यात येत आहेत. या बदलांमुळे शेतीतून मिळणारऱ्या उत्पन्नातही समाधानकारक वाढ हाेत आहे. मात्र एकीकडे आधुनिक शेती करत असताना उत्पन्न वाढविण्यासाठी वापरण्यात येणारी खते व तणनाशके यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादनावर होणारा खर्चदेखील वाढला आहे. अशावेळी पर्यावरणातील बदलांचा शेतीवर हाेत असलेला परीणाम पाहता हा उदत्पादन खर्च वसूल होईल की नाही, असा गंभीर प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला अाहे. एकीकडे महागाई व दुसरीकडे पर्यावरणातील बदल अशा कात्रीत येथील शेतकरी सापडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून तणनाशक आणि खतांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला महागाईचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे शेती करायची की सोडून द्यायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

दरम्यान तालुक्यात काही वर्षांपासून नैसर्गिक संकटामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. अतिवृष्टी, दुष्काळ व अन्य नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पूरेसे उत्पन्न पडताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे बियाणे, खते व औषधीच्या दरामध्ये कंपन्यांकडून भरमसाठ वाढ केली जात आहे. विशेष म्हणजे यावर्षी तर प्रत्येक औषधी, बियाणे व खतांच्या दरामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पिकांवर होणारा खर्च उत्पादनातून निघत नसल्याने शेती सोडताही येत नाही आणि करता येत नाही, अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

मागील काही दिवसांपासून खत, बियाणे व तणनाशकाच्या भावामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खतांवरील खर्च व पिकांमधून मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसविणे अवघद बनले आहे डीएपी खताच्या प्रत्येक गोणीमागे गतवर्षीपेक्षा यावर्षी १५० रुपयांनी भाववाढ झाली आहे. १०:२६:२६ या खताच्या ५० किलोच्या पोत्यामागे २०० रुपयांची भाववाढ झाली आहे. त्याचबरोबर राऊंड अप या तणनाशक औषधाच्या प्रतिलिटर मागे ३०० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांचा अंत पाहणारी असल्याचे बाेलले जात आहे. या संदर्भात शासनाने ठाेस पावले उचलण्याची गरज व्यक्त हाेत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in