
मुरुड तालुक्यातील आगरदांडा परिसरात अदानी पोर्ट विकासाचे काम जोरदार सुरू आहे. सुमारे ३५०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले व एक आंतराष्ट्रीय बंदर म्हणून विकसित होणारे दिघी पोर्ट लिमिटेडकडे मोठ्या अपेक्षेने पहिले जात आहे. मात्र सध्या या पाेर्टचे काम करण्यासाठी आणलेल्या ड्रेझर बाेटीमुळे येथील मच्छीमार हैराण झाले आहेत.
राजपुरी खाडीमधील आगरदांडा, दिघी, एकदरा, मुरुड या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात मच्छीमारी करतात. दरम्यान दीड महिन्यापूर्वी दिघी बंदरात ड्रेझर ही महाकाय बोट आणण्यात आली आहे. मुंबई पासून दिघी बंदरात मालवाहू जहाज येण्यासाठी एका चॅनेलची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी पद्मदुर्ग किल्ल्यापासून पुढील अंतरावर महाकाय ड्रेझर बोटीद्वारे समुद्रातील चिखल काढण्यात येत आहे.
परंतु ही बोट समुद्रातून चिखल काढत असताना सदरचा काढलेला चिखल व गाळ हा पद्मदुर्ग किल्ल्याच्या परिसरातच टाकण्यात येत असल्याने याचा त्रास स्थानिक मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. या परिसरातच मच्छीमार मासेमारी करावयास जातात तेव्हा त्यांना त्यांच्या जाळ्यात मासळी न सापडता चिखल व गाळ येत आहे. त्यामुळे या परिसरातील मासेमारी नष्ट हाेण्याच्या मार्गावर आहे. तसेच ड्रेझरने हा भाग अधिक खोल केला तर समुद्राच्या तळाशी असणारे विषारी वायू समुद्राच्या वर आल्यास मासेमारीवर कायमस्वरूपी संकट कोसळणार असल्याची भिती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या नुकसानाची दिघी पोर्टने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.