डोंबिवलीतील गणेश घाट पावसामुळे तुडुंब 

डोंबिवली पश्चिम खाडीकिनारी आणि पूर्वेकडील आयरे-भोपर विभागात अशी पूरस्थिती दिसून येत आहे
डोंबिवलीतील गणेश घाट पावसामुळे तुडुंब 

मागील आठवड्यापासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे काही अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागले असले तरी कोणतेही मोठे नुकसान पावसामुळे झाले नाही. या आठवड्याच्या सुरुवातीपासुनच पावसाने सगळीकडे पाणीचपाणी चहूकडे अशी परिस्थिती केल्याचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासात खूप पाऊस झाल्यामुळे आणि समुद्राच्या भरतीमुळे खाडीकिनारी पाणीच पाणी झाल्यामुळे डोंबिवलीतील सर्व गणेशघाट पाण्याने तुडुंब भरून पूरसदृश्य परिस्थिती झाली आहे.

डोंबिवली पश्चिम खाडीकिनारी आणि पूर्वेकडील आयरे-भोपर विभागात अशी पूरस्थिती दिसून येत आहे. पश्चिमेकडील मोठागाव ठाकुर्ली येथील गणेशघाट पूर्णपणे तुडुंब भरला आहे. कुंभारखानपाडा येथील गणेशघाट आणि जुनी डोंबिवली येथील गणेशघाट पूर्णपणे जलमय झाले आहेत. मात्र आता या सर्व गणेशघाटांची परिस्थिती अतिशय घाणेरडी झाली असून खाडीतील सर्व कचरा-घाण गणेशघाट परिसरात आला असून तिथे दुर्गंधी येत असल्याचे काही नागरिक सांगत आहेत. तर सदृष्य पूरपरिस्थिती निवळल्यानंतर स्वच्छता करण्यात येईल असे स्थानिक लोकप्रतिनिधी सांगत आहेत. जरी खाडीकिनारी पुरसदृश्य परिस्थिती असली तरी शहरात पाणी साचले नसल्याचे समजत आहे. खाडीकिनारी पुरसदृश्य परिस्थितीबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गणेशघाट परिसरात पोलीस लक्ष ठेवून आहेत असे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in