उल्हासनगरमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु, छोट्या पक्षांचे पदाधिकारी जोमात

उल्हासनगर शिवसेनेतील 12 नगरसेवकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे
उल्हासनगरमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु, छोट्या पक्षांचे पदाधिकारी जोमात
ANI

उल्हासनगर शिवसेनेतील 12नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबर असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे. ह्या जागा भरण्यासाठी शिवसेना तसेच शिंदे समर्थकांनी मनसे तसेच छोट्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली आहे.

उल्हासनगर मध्ये कॅम्प 4 मधील मराठा सेक्शन हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ह्या परिसरात असलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक शेखर यादव आणि मिताली चांपुर यांनी शिवसेनेत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. ह्याच प्रभागातील नगरसेवक लीलाबाई आशान आणि दिवंगत नगरसेवक सुनिल सुर्वे यांचे भाऊ संदीप सुर्वे यांनी शिंदेच्या बंडाला समर्थन दिले आहे. यामुळे मराठा विभागातील शिवसेनेत दुफळी पडली आहे. याच परिसरात मनसेचे सचिन कदम हे कार्यरत असून त्यांचा भाव वधारला आहे. अशीच परिस्थिती मराठा विभागाला लागून असलेल्या ललचक्की परिसरात आहे. ह्या परिसरातील नगरसेविका ज्योत्स्ना सुरेश जाधव यांनी शिंदेंना समर्थन दिले आहे. उर्वरित नगरसेवक सुमित सोनकांबळे, ज्योती माने, रमेश चव्हाण हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर असल्याचे चित्र आहे. सुमित सोनकांबळे ह्याचा भाऊ शक्ती हा मात्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात वावरताना दिसल्याने थोडी साशंकता आहे. ह्या परिसरात मनसेचे प्रदीप गोडसे हे कार्यरत आहेत. कॅम्प 4 मधील संतोष नगर हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, या परिसरातील नगरसेवक धनंजय बोडारे, वसुधा बोडारे, शीतल बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर असल्याचे जाहीर केले आहे.

उल्हासनगर कॅम्प 3 मधील शांतीनगर हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ह्या परिसरात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि त्यांच्या पत्नीच्या प्रभाग आहे. ह्या प्रभागातील पुष्पा बागुल आणि शुभांगी बेहनवाल यांनी शिंदेंना समर्थन दिले आहे. तसेच ह्याच प्रभागाला लागून असलेल्या चौपडा परिसरातील स्वप्नील बागुल, अंजना म्हस्के आणि कलवंत सिंग सोहता यांनी शिंदेंना समर्थन दिले आहे. याच प्रभागाला लागून असलेल्या शहाड फाटक परिसरात माजी नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर यांचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यावर भुल्लर समर्थकांनी जल्लोष केला, मात्र भुल्लर याना याबाबत विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे असल्याने आम्ही जल्लोष केल्याचे सांगितले. या परीसरात मनसेचे संजय घुगे, सचिन बेंडके, मैनुद्दिन शेख हे कार्यरत आहेत. सेंच्युरी कंपनी परिसरातील नगरसेविका ज्योती गायकवाड, उपशहर प्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, युवा सेना अधिकारी बाळा श्रीखंडे, शाखाप्रमुख सुरेश पाटील हे शिवसेनेसोबत असल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर कॅम्प 5 मधील भाजप मधून बाहेर पडून शिवसेनेत गेलेले विजय पाटील, रवी पाटील, युवा सेना महासचिव युवराज पाटील हे कट्टर शिंदे समर्थक आहेत. त्यांनी पहिल्याच दिवशी शिंदेच्या उठावाला समर्थन दिले आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटातील राजू दुर्गे, लाल्या कुंचे, बशीर शेख यांनी दंड थोपटत आवाहन उभे केले आहे. ह्या परिसरात मनविसेचे मनोज शेलार हे कार्यरत आहेत. याच परिसराच्या बाजूला शिवसेनेचे परशुराम पाटील यांचा बालेकिल्ला आहे. पाटील हे मागील काही दिवसांपासून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बरोबरचे फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत. त्यांचे भाऊ माजी नगरसेवक प्रधान पाटील हे बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in