
आगामी पावसाळ्याला तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. साथरोगांच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आरोग्य विभागामार्फत जिल्हा, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर साथ नियंत्रण कक्ष व पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्ती काळासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक तो औषधांसह सर्पदंशावरील इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शानाखाली जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हास्तरावर तीन भरारी पथक स्थापन करण्यात आले असून ती २४ तास कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात तीन तज्ज्ञ डॉक्टरांचे शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत असून येथील आरोग्य विभागात साथ नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर देखील हा कक्ष कार्यान्वित आहे.
तालुका स्तरावर भरारी पथक स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका पर्यवेक्षक, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांसह २४ तास कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
प्रत्येक आरोग्य संस्थेस आवश्यक त्या औषधसाठ्यासोबत सर्पदंशावरील इंजेक्शनसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर जादा औषधसाठादेखील उपलब्ध करण्यात आला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना प्राथमिक उपचारासाठी औषधे देण्यात आली आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या २१ औषधांची यादी पाठविण्यात आली असून तीन महिने पुरेल इतका औषधसाठा करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.