
राज्यभरात पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. मात्र उल्हासनगर व अंबरनाथ येथील नालेसफाई अद्यापही सुरू झालेली नाही. या दाेन्ही ठिकाणी निविदा प्रकि्रया पूर्ण न झाल्याने नालेसफाई रखडल्याचे दिसून येत आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच नाले कचरा व गाळाने भरले आहेत. अचानक पाऊस पडल्यास शहरात पुराचा धोका उत्पन्न होऊ शकतो, मात्र प्रशासनाने अद्यापही नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत एकूण ४८ नाले असून त्यातील १० मोठे नाले आहेत, त्यात मुख्यतः वालधुनी नदी, खेमानी नाला आदींचा समावेश आहे. बहुतांश नदी-नाल्यांचा किनारी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाल्यामुळे अगोदरच हे नाले अरुंद झाले आहेत. त्यात नालेसफाई नसल्याने पुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रत्यक्षात नालेसफाई कधी सुरू होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.