ठाण्यातूनच शिवसेनाला सुरुंग लागण्याची सुरुवात ?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तविली आहे
 ठाण्यातूनच शिवसेनाला सुरुंग लागण्याची सुरुवात ?

अडीच वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ५२ वर्षाच्या वाटचालीत ठाणेकरांनी शिवसेनेला मोठे योगदान दिले, शिवसेनेला पहिली सत्ता देखील याच ठाणे शहराने दिली. विशेष म्हणजे १९९९ साली राज्यावर शिवसेनेचा पहिल्यांदा भगवा फडकला होता आता दुसऱ्यांदा राज्यावर शिवसेनेची सत्ता आली आहे. दरम्यान ज्या ठाणे शहराने शिवसेनेला सत्ता मिळवून दिली त्याच ठाण्यातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सत्तेला याच ठाण्यातून सुरुंग लागला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला उतरती कळा लागण्याची शक्यता वर्तविली आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर अवघ्या वर्षभरात शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली ती ही ठाणे नगरपालिकेत. तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचे ठाणे शहराशी मौलिक नाते निर्माण झाले. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली आणि ठाण्यात शिवसेनेची पहिली शाखा १ जानेवारी १९६७ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर १९६७ च्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली. शिवसैनिक वसंतराव मराठे हे पहिले ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

तेव्हापासून ठाणे आणि शिवसेना असे जणू काही समीकरणच तयार झाले. त्यानंतरही १९७४ मध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सतीश प्रधान हे निवडून आले होते.

ठाणे नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर झालेल्या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळाली आणि पहिले महापौरही शिवसेनेचे सतीश प्रधान हेच विराजमान झाले होते. प्रत्येक महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आवर्जून ठाण्यात सभा घ्यायचे, अगदी २००७ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी ठाण्याच्या सेंट्रल मैदानात झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुखांनी ठाणेकरांना वाकून साष्टांग नमस्कार घातला होता. तेव्हा ठाणेकरांनी शिवसेनेला सत्ता दिली होती. तसेच २०१२ च्या सुरुवातीला झालेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराकरिता तब्येत बरी नसतानाही शिवसेना प्रमुख ठाण्यात आले होते.

एकनाथ शिंदे यांना

शिवसेनकडून महत्वाची पद

सुरूवातीला शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत गटनेते, जिल्हाप्रमुख नंतर आमदार, जिल्हा संपर्क मंत्री,भाजप शिवसेनेची सत्ता येताच सुरूवातीला विरोधी पक्ष नेते, शिवसेना नेतेपद , नंतर कॅबिनेट मंत्री, महाविकास आघाडीची सत्ता येत असताना सुरवातीला मुख्यमंत्री पदाची चर्चा, नंतर राज्याच्या सरकारमध्ये क्रमांक २ चे नगरविकासमंत्री अशी महत्वाची पद शिवसेनेकडून एकनाथ शिंदे याना भलं करण्यात आली आहेत .

ठाण्यात शिवसेनेला उतरती कळा?

ठाणे जिल्ह्यावर सध्या तरी एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे, ठाणे, कल्याण डोंबिवली या महत्वाच्या महापालिकांवर शिवसेनेची सत्ता, जिल्हा परिषदेत सत्ता, तालुका पंचायत समित्या, बहुतांशी नगर पालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती यावर शिवसेनेची सत्ता असून बहुतांशी सत्तेच्या पदावर शिंदे समर्थक विराजमान आहे. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले डॉ श्रीकांत शिंदे हे त्यांचे पुत्र आहेत तर जिल्ह्यत निवडून आलेले जे आमदार आहेत ते बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर हेही शिंदे यांच्या सोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तर सत्तेवर असलेले बहुतांशी समर्थक त्यांच्या सोबत जाण्याची शक्यता असल्याने शिवसेनेला जिल्ह्यात मोठा हादरा बसू शकतो.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in